बोरिवलीत घरफोडी करणारी टोळी गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रात्रीच्या वेळेस धूम स्टाइलने बोरिवली परिसरात येऊन घरफोडय़ा करणाऱया तिघांना एमएचबी पोलिसांनी अटक केली. रशीद शेख, हुसेन शेख आणि राजू आंबेकर अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

काही दिवसांपूर्वी बोरिवलीच्या आयसी कॉलनी परिसरात पहाटेच्या वेळेस चोरटय़ांनी 15 दुकाने फोडल्याची घटना घडली होती. त्याची दखल वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांनी घेतली. तपासाकरिता चार पथके तयार करण्यात आली. परिमंडळ 11 चे उपायुक्त डॉ. मोहनकुमार दहीकर, सहाय्यक आयुक्त सुनील वडके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक पंडित ठाकरे, पोलीस निरीक्षक धनंजय लिगाडे, उपनिरीक्षक विजय धोत्रे, दीपक, हिंडे, खान, जोपळे, खताते, सांगळे यांनी तपास सुरू केला. पोलिसांनी 7-8 ठिकाणच्या सीसीटीव्हींची पाहणी केली. कौशल्याचा वापर करून पोलिसांनी रशीद आणि हुसेनला ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत राजूचे नाव समोर आले. या तिघांना पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्यांनी घरफोडीची कबुली दिली. त्यांच्याकडून 1 लाख 96 हजारांची मालमत्ता हस्तगत केली.

सिंगल शटरचे दुकान करायचे टार्गेट

ही टोळी विरार, नवी मुंबई, ठाणे ग्रामीण येथे एकत्र यायची. रात्री तेथे जमल्यानंतर ते चोऱया करण्यासाठी ठिकाण ठरवत असायचे. ज्या दुकानांना सिंगल शटर आहे ती दुकाने हे फोडायचे. रात्री फिरण्याकरिता या टोळीने नेरूळ आणि शिवाजी नगर येथून मोटारसायकल चोरल्या होत्या. पोलिसांना संशय येऊ नये म्हणून मोटारसायकलला बनावट नंबर प्लेट लावली होती.

दुकानांच्या पाटय़ा पाहून करायचे चोऱया

दुकानांच्या पाटय़ांवरून गल्ल्याचा अंदाज बांधत पहाटेच्या वेळेस चोरी करणाऱया दुकलीला बोरिवली पोलिसांनी अटक केली. अफसर सलमानी आणि आझम खान अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांनी रात्री चोऱया करण्याकरिता ओशिवरा येथून मोटारसायकल चोरली.

गेल्या आठवडय़ात बोरिवली पश्चिमच्या चिकूवाडी परिसरातील चार दुकानांत घरफोडय़ा झाल्या होत्या. चोरटय़ांनी 86 हजारांच्या वस्तू चोरल्या होत्या. याप्रकरणी बोरिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. वरिष्ठ निरीक्षक लक्ष्मण डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद घाग, पोलीस उपनिरीक्षक योगेश पाटील, शेख, गाढवे, तडवी यांनी तपास सुरू केला. पथकाने या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्aााr तपासणी केली असता एका फुटेजमध्ये दोघेजण चेहऱयावर मास्क लावलेले दुकानात शिरल्याचे उघड झाले. मास्क लावून चोऱया करणाऱया चोरटय़ांची पोलिसांनी माहिती काढल्यानंतर तपासाची चक्रे फिरली.

आझम आणि अफसर हे दोघे रात्रीच्या वेळेस चोऱया करण्याकरिता बाहेर पडायचे. जेथे सुरक्षारक्षक आणि जास्त वर्दळ नसलेल्या परिसरात ते जायचे. चोरी करण्यापूर्वी ते दुकानांच्या पाटय़ा बघत असायचे. त्यावरून त्या दुकानांत किती पैसे असतील याचा अंदाज बांधून चोरी करत असायचे. चोरलेल्या पैशांतून ते नशा करत असायचे. शनिवारी पोलिसांनी गोराई नाल्याजवळून अफसर आणि आझमला ताब्यात घेतले. या दोघांकडून एक मोटारसायकल, पक्कड आणि क्रू ड्रायवर जप्त केले. या दोघांकडून पोलिसांनी 72 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. न्यायालयाने या दोघांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

बोरिवली ते माटुंगा करायचे चोरी

आझम आणि अफसर हे दोघे बोरिवली ते माटुंगा या परिसरात चोऱया करायचे. अफसरविरोधात 21 गुन्हे दाखल आहेत. त्याने नाव बदलून मालाड, गोरेगाव, चारकोप येथे चोऱया केल्या होत्या. रात्री चोऱया करण्यासाठी या दोघांनी काही महिन्यांपूर्वी ओशिवरा येथून मोटारसायकल चोरली होती.