
मुंबईत गोवरचा धोका वाढला असून आज दिवसभरात गोवरचे 16 नवे संशयित रुग्ण सापडल्यामुळे मुंबईतील एकूण गोवर संशयित मुलांची संख्या 142 वर पोहोचली आहे. तीव्र लक्षणे असलेल्या 6 बालकांना आज उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने एकूण मुलांची संख्या 66 वर पोहोचली आहे. यातील 5 मुलांची प्रकृती गंभीर असून त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
मुंबईत गेल्या काही दिवसांत गोवर संशयित रुग्णांची संख्या वाढत असून सोमवारी गोवर संशयित 17 मुले सापडली तर आज दिवसभरात 16 नवी गोवर संशयित मुले सापडली. त्यामुळे मुलांची एकूण संख्या 142 वर पोहोचली आहे. गोवंडीत 9 नोव्हेंबरला गोवर संशयित तीन मुलांचा मृत्यू झाल्यानंतर कस्तुरबा रुग्णालयात आतापर्यंत उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या चार मुलांचाही मृत्यू झाला आहे.
सोमवारी दुपारी साडेतीन वाजता कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एक वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. त्याला तापाबरोबर न्यूमोनियाही झाला होता. हा मुलगा नळबाजारात राहणारा होता. दरम्यान, एम पूर्व, ई, एफ-उत्तर, जी-दक्षिण, एल, एम-पश्चिम, पी-उत्तर, एच-पूर्व या 8 विभागांत गोवर सर्वेक्षण आणि लसीकरण मोहिमेला वेग आला आहे.
50 हजार मुलांचे लसीकरण करणार
मुलांचे लसीकरण वाढवा, मुलांसाठी स्वतंत्र ओपीडी सुरू करावी आणि सर्वेक्षण करून संशयित लक्षणे असणाऱया मुलांवर लक्ष ठेवा, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी मुंबई महानगरपालिका अधिकाऱयांना आज दिले. येत्या काही दिवसांत सुमारे 50 हजारांहून अधिक मुलांना लसीकरण करण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे.
गोवंडीत विलगीकरण कक्ष
एम पूर्व विभागात येणाऱया गोवंडीतील रुग्णांची संख्या जास्त आहे. त्या पार्श्वभूमीवर गोवंडीतील शिवाजीनगर नागरी आरोग्य पेंद्रात सौम्य लक्षणे असलेल्या मुलांसाठी विलगीकरण कक्ष उभारण्यात आला असून शताब्दी, गोवंडी आणि राजावाडी रुग्णालयात गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर अतिगंभीर रुग्णांवर पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
धारावीत रात्रीही लसीकरणासाठी शिबिरे!
कोरोनात हॉटस्पॉट झालेल्या धारावीत गोवरविरोधात घरोघरी तीन ते साडेतीन हजार घरांचे सर्वेक्षण दररोज केले जात आहे. त्याचबरोबर गोवरचा धोका लक्षात घेऊन महापालिका धारावीत लवकरच रात्रीही शिबिरे घेऊन लसीकरण मोहीम राबण्याच्या तयारीत आहे. यासाठी आरोग्यसेविकांसह धारावीतील 350 खासगी डॉक्टरांचीही मदत घेतली जाणार आहे, अशी माहिती जी उत्तरचे आरोग्य अधिकारी डॉ. वीरेंद्र मोहिते यांनी दिली.
रुग्णवाहिका सुविधा, अतिरिक्त मनुष्यबळ
गंभीर रुग्णांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्याकरिता रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आली आहे. त्याचबरोबर अतिरिक्त मनुष्यबळाचे नियोजन करण्यात आले असून 470 आशा, 200 स्वयंसेवक मुंबईतील 24 विभागांत सज्ज करण्यात आले आहे.



























































