
मुंबईत गोवर रुग्णसंख्या वाढतच असून आज एकाच दिवसात 26 गोवरबाधित रुग्ण आढळले आहेत. यामुळे मुंबईतील गोवरबाधित रुग्णांची एकूण संख्या 412 वर पोहोचली आहे. तर दिवसभरात 77 गोवर संशयित रुग्णांची नोंद झाल्याने मुंबईतील रुग्णांची संख्या 422 वर पोहोचली आहे.
मुंबईमध्ये गेल्या दोन महिन्यात गोवरच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पालिकेच्या 24 पैकी 16 विभागात गोवरचा प्रसार झाला आहे. आतापर्यंत निश्चित निदान झालेले एकूण 412 रुग्णांची तर 4587 संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. गोवर मुळे आतापर्यंत 14 मुलांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 11 मृत्यू मुंबईतील तर 3 मृत्यू मुंबई बाहेरील आहे. सध्या 21 रुग्ण ऑक्सीजनवर, 4 रुग्ण आयसीयुमध्ये तर 2 रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
गोवरच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या माध्यमातून आतापर्यंत मुंबईत 68 लाख 16 हजार 586 घरांचा सर्व्हे करण्यात आला आहे. त्यात ताप आणि लाल पुरळ असलेले 4587 संशयित रुग्ण आढळून आले आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत गोवरचे निश्चित निदान झालेले 412 रुग्ण आढळून आले आहेत. गोवर रुग्णांवर उपचार करण्यासाठी विविध रुग्णालयात 330 बेडस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यापैकी 89 बेडवर रुग्ण असून इतर बेड रिक्त आहेत. 149 जनरल बेडपैकी 64, 146 ऑक्सीजन बेड पैकी 26, 35 आयसीयु बेडपैकी 4 बेडवर रुग्ण आहेत.
20 व्हेंटिलेटर असून त्यापैकी 2 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. आतापर्यंत अतिरिक्त सत्रात 19 हजार 688 मुलांचे लसीकरण करण्यात आले आहे. 9 महिने ते 5 वर्षांपर्यंतच्या 1 लाख 88 हजार 013 मुलांपैकी 11,261 बालकांना गोवरची अतिरिक्त लस देण्यात आली आहे. मुंबईत 9 महिने पेक्षा कमी वयाच्या रुग्णांचे प्रमाण 10 टक्के पेक्षा अधिक आहे अशा विभागातील 6 ते 9 महिन्यातील 3569 बालकांपैकी 686 बालकांना गोवरची अतिरिक्त लस देण्यात आली आहे.


























































