
शीव-ट्रॉम्बे येथील सुमननगर जंक्शनजवळच्या 1800 व्यासाच्या मुख्य जलवाहिनीच्या मोठय़ा दुरुस्तीचे काम आज मध्यरात्री पूर्ण झाले. या दुरुस्तीमुळे बंद असलेल्या सात वॉर्डमधील पाणीपुरवठा उद्या पहाटेपासून सुरळीत होणार आहे. दरम्यान, या दुरुस्तीमुळे पाणीपुरवठा बंद राहिल्याने नागरिकांची गैरसोय झाली.
शीव-ट्रॉम्बे येथील सुमननगर जंक्शन जवळून जाणाऱ्य़ा 1800 व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याने अनेक वॉर्डमध्ये पाणीपुरवठय़ावर परिणाम होत होता. त्यामुळे ही गळती तातडीने बंद करण्यासाठी 11 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजल्यापासून जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले.
त्यामुळे ए वॉर्ड, ई वॉर्ड, बी वॉर्ड, एफ/उत्तर, एफ/दक्षिण, एम/पूर्व, एम/पश्चिम या वॉर्डमधील पाणीपुरवठा बंद होता. ही दुरुस्ती मोठी असल्याने मध्यरात्रीपर्यंत काम सुरू होते अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
दरम्यान, उद्या पाणीपुरवठा सुरळीत होणार असला तरी काही भागात मात्र उद्याचा दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. तसेच गुरुवारी पाणी उकळून आणि गाळून प्यावे, असे आवाहनही पालिकेने केले आहे.
























































