
तंत्रज्ञानाची सांगड घालत क्यूआर कोडचा वापर करून मुंबई पोलीस आता स्मार्ट पोलिसिंग करणार आहे. क्यूआर कोडचा उपक्रम प्रायोगिक तत्वावर दक्षिण मुंबईत सुरु करण्यात आला आहे. त्याला मिळणाऱया प्रतिसादानंतर हा उपक्रम संपूर्ण मुंबईत राबवला जाणार आहे.
मुंबईत सरकारी संकुल, कॉर्पेरेट हब, ऐतिहासिक, प्रार्थनास्थळ आहेत. तेथे गुन्हे कमी करण्याबाबत मॅपिंग केले जाते. यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून मुंबई पोलीस स्मार्ट पोलिसिंग करणार आहेत. दक्षिण मुंबईतील, गिरगाव चौपाटी, मारिन ड्राईव्ह, गेट वे आणि ईडी कार्यालयाबाहेर पोलिसांनी क्यूआर कोड लावले आहे. यामुळे बीट मार्शलने किती वेळा त्या परिसराला भेटी दिल्या याची माहिती उपलब्ध होईल. दक्षिण मुंबईत क्यूआर कोडला मिळणारा प्रतिसाद पाहिला जाणार असल्याचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितले.
असे असेल स्मार्ट पोलिसिंग
प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 60 ठिकाणे निवडली जाणार आहे. त्याचे ए, बी, सी असे तीन प्रकार असतील. ‘ए’ प्रकारात महत्त्वाची ठिकाणे निवडली जाणार आहे. तेथे दर दोन तासाला बीट मार्शल गस्त करणार आहेत. ‘बी’ प्रकारात दिवसातून एकदा तर ‘सी’मध्ये आठवडय़ातून एखाद्या दिवशी बीट मार्शल तेथे जातील. पोलिसांना स्मार्ट फोनमध्ये अप्स घ्यावे लागेल.



























































