मुंबईची भट्टी झाली; पारा 39 वर

मुंबईचा पारा गेल्या दोन दिवसांपासून तब्बल 39 डिग्री सेल्सिअसवर गेला असून अक्षरशः भट्टी झाल्यासारखे चटके बसत आहेत. पुढच्या दोन दिवसांत पारा 40 डिग्री सेल्सिअसवर जाईल असा अंदाज हवामान विभाग आणि स्कायमेटने व्यक्त केला आहे. सकाळी 11 वाजल्यापासूनच उन्हाचे प्रचंड चटके बसत आहेत. दुपारी 4 वाजेपर्यंत उन्हाच्या तीव्र झळा बसत असून रेल्वे, बस, टॅक्सीतून प्रवास करताना अंगातून घामाच्या धारा वाहत असल्याचे चित्र आहे. सनस्ट्रोक, डिहायड्रेशन होण्याचा धोका अधिक असल्यामुळे सकाळी 11 ते दुपारी 4 दरम्यान शक्यतो घराबाहेर पडू नये, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

कशामुळे वाढले तापमान?

गुजरात, राजस्थानकडून उष्ण वारे मुंबई, महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहेत. त्यामुळे उन्हाचे अक्षरशः चटके बसत आहेत. पारा वाढला आहे. पुढचे दोन दिवस पारा आणखी 1 ते 2 डिग्री सेल्सिअसने वाढेल. त्यानंतर पुन्हा तापमान 33 ते 35 डिग्री सेल्सिअसवर येईल, अशी माहिती स्कायमेटचे महेश पलावत यांनी दिली.

 

डॉक्टर म्हणतात!

सकाळी 11 ते दुपारी 4 दरम्यान शक्यतो घराबाहेर पडू नका. भरपूर पाणी प्या. टोपी, स्कार्फचा वापर करा. थकवा, अस्वस्थता जाणवल्यास तातडीने उपचार घ्या, असे आवाहन नायर रुग्णालयाच्या कान, नाक आणि घसा शस्त्रक्रिया विभागाच्या प्राध्यापक आणि विभागप्रमुख डॉ. बची हाथीराम यांनी केले आहे.

चेंबूर, सांताक्रुझ हॉट

दोन दिवसांपासून मुंबईकर उन्हाचे चटके आणि असह्य उकाडय़ाने हैराण आहेत. उसाच्या, लिंबाच्या सरबताची जास्त विक्री होताना दिसत आहे. आज चेंबूर आणि सांताक्रुझमध्ये 39 डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली, तर बोरिवली, मुलुंड येथे 38 तसेच कुलाबा, वरळी येथे 36 आणि पवई येथे 37 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. ठाण्यात पारा 39 अंशांवर गेला आहे, तर नवी मुंबईत 38 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.