25 मेपासून एटीकेटी परीक्षा; अद्याप पुनर्पडताळणीचा निकाल नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई विद्यापीठ विधी शाखा अंतिम वर्षाची पाचव्या सत्राची परीक्षा दिलेले विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. डिसेंबर 2022मध्ये ही परीक्षा पार पडली. या परीक्षेचा निकाल गेल्या महिन्यात 17 एप्रिलला जाहीर करण्यात आला. जे विद्यार्थी परीक्षेत नापास झाले आहेत त्यांनी लागलीच पुनर्पडताळणीसाठी अर्ज केला. मात्र अद्याप पुनर्पडताळणीचा निकाल जाहीर झालेला नाही. त्यातच 25 मेपासून एटीकेटीची परीक्षा सुरू होणार असून ही परीक्षा द्यायची की पुनर्पडताळणीच्या निकालाची वाट पहायची, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. दरम्यान पुनर्पडताळणीसाठीच्या पाचव्या सत्राच्या काही विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका गहाळ झाल्याचा संशय असून विद्यापीठ, महाविद्यालयाच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

विधी शाखेच्या पाचव्या सत्राचा निकाल दोन टप्प्यात जाहीर झाला. आधी मार्चअखेरीस निकाल जाहीर करण्यात आला. त्यानंतर 17 एप्रिलला काही विद्यार्थ्यांना निकाल सांगण्यात आला. या निकालात अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेला हजर असूनही गैरहजर दाखविण्यात आले होते. तर काही विद्यार्थ्यांना एक-दोन गुणांनी नापास केले होते. या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका पुनर्पडताळणीसाठी अर्ज केला, मात्र अद्याप त्यांचा निकाल जाहीर झालेला नाही. त्यातच 25 मेपासून एटीकेटीची परीक्षा सुरू होत आहे. निकालाची वाट न पाहता एटीकेटीच्या परीक्षेची तयारी विद्यार्थ्यांनी सुरू केली आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या चुकीची नाहक शिक्षा आणि भुर्दंड विद्यार्थ्यांना बसणार असून विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे.

दरम्यान विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका गहाळ झालेल्या नाहीत, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले. परीक्षेच्या वेळी काही विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेवर बारकोड, बैठक क्रमांक, विषय कोड, पेपर कोड अशी वैयक्तिक व विषयासंदर्भातील चुकीची माहिती नमूद केल्यामुळे ती उत्तरपत्रिका कोणत्या विद्यार्थ्याची आहे, हे ऑनलाईन पेपर तपासणीत कळत नाही. त्यामुळे सदर उत्तरपत्रिका ऑफलाईन पद्धतीने पाहण्यात येतात. यामुळे अशा विद्यार्थ्याचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. आतापर्यंत विधी शाखेच्या अनेक विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका ऑफलाईन पद्धतीने तपासून निकाल जाहीर केले आहेत. राहिलेल्या काही विद्यार्थ्यांचे निकाल एक-दोन दिवसांत विद्यापीठ जाहीर करणार आहे.