
प्लॉटधारकांना खोटे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ज्येष्ठ नाटय़ आणि चित्रपट अभिनेते विक्रम गोखले यांना बुधवारी मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. 28 ऑक्टोबर पर्यंत त्यांच्याविरोधात कोणताही कारवाई करू नये असे आदेश हायकोर्टाने बुधवारी पुणे पोलिसांना दिले.
25 वर्षांपूर्वी सुजाता फार्म प्रा. लिमिटेड स्थापन करुन ‘गिरीवन प्रोजेक्ट’ कंपनीची स्थापना करण्यात आली. तेव्हा विक्रम गोखले हे ‘गिरीवन प्रोजेक्ट’चे अध्यक्ष होते. हा प्रोजेक्ट सरकारमान्य असल्याचा दावा करुन त्यांनी ग्राहकांना प्लॉट विकले. मात्र प्लॉट चे कागदपत्रे मूळ जागेशी मिळते जुळते नव्हते. गिरीवन प्रोजेक्ट हा प्रायव्हेट हिल स्टेशनवर असल्याचे सांगून एकूण 14 जणांची फसवणूक केल्याप्रकरणी जयंत बहिरट यांनी जयंत म्हाळगी, सुजाता म्हाळगी आणि विक्रम गोखलें या तिघांविरोधात मार्च महिन्यात पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तेव्हा, अटक होऊ नये म्हणून विक्रम गोखले यांनी पुणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी 25 सप्टेंबर रोजी अर्ज केला सत्र न्यायालयाने तो फेटाळून लावल्याने गोखले यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. या अटकपूर्व जामीन अर्जावर बुधवारी न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली.





























































