
महिलांवरील अत्याचार रोखणाऱया, बँकिग क्षेत्रात स्वतंत्र ठसा उमटवणाऱया…आणि अपत्यप्राप्तीसाठी आसुसलेल्या हजारो स्त्र्ायांचे आशास्थान असलेल्या महिलांचा सन्मान नुकताच करण्यात आला. या संगीतमय सोहळ्याचे आदिशक्ती.. अक्षरशक्ती…हे आकर्षण ठरले.
जागतिक महिला दिनानिमित्त रमा प्रकाशनाने विलेपार्ले पूर्व येथील लोकमान्य सेवा संघाच्या प्रांगणात रसिक श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. विद्या करलगीकर, वृषाली पाटील, डॉ. राम पंडित आणि नचिकेत देसाई या नामवंत गायक-कलावंतांनी पेश केलेल्या एकाहून एक सुंदर आणि अत्यंत श्रवणीय हिंदी -मराठी गीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. पण त्याहीपेक्षा त्या गीतांतून व्यक्त होणारी, जीवनसंघर्षावर मात करण्याच्या स्त्रीयांच्या जिद्दीप्रती कृतज्ञतेची भावना श्रोत्यांच्या अंतःकरणाला भिडत होती. यावेळी अभिनेत्री गिरिजा ओक-गोडबोले हिने केलेल्या काही कथा -कविता-लेखांचे अभिवाचन करून श्रोत्यांची दाद मिळवली. त्यातही दुर्गा भागवत यांच्या कृष्ण-सखाचे तिने केलेले अभिवाचन रसिकांच्या मनात अनेक दिवस रुंजी घालत राहील.
नामवंत आणि अभ्यासू सूत्रसंचालिका उत्तरा मोने यांनी सर्वच सत्कारमूर्ती महिलांशी सुसंवाद साधत त्यांना बोलके केले. राहीबाई पोपेरे या बीजमाता म्हणून सुपरिचित झाल्या आहेत. अकोले (नगर) जवळील दोन -तीन हजार लोकवस्तीच्या खेडय़ातून नऊवारी लुगडे आणि नथ लेवून झोकात आलेल्या राहीमावशींनी आपल्या खणखणीत आवाजात उपस्थितांना महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन टाळ्या मिळविल्या. काळी माती हीच आपली आई. रासायनिक खतांचा मारा करून तिला करपून टाकू नका, असे कळकळीचे आवाहन यावेळी त्यांनी केले.



























































