
सामना प्रतिनिधी, ठाणे/संभाजीनगर
येथील दहशतवादविरोधी पथकाने ऐन प्रजासत्ताक दिनी ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे जाऊन उमत मोहम्मदीया ग्रुपच्या संपर्कात असलेल्या आणखी एका संशयित मुस्लिम तरुणास अटक केली आहे. तलाह ऊर्फ अबुबकर हनिफ पोतरीक असे या 24 वर्षीय तरुणाचे नाव असून एटीएसने त्याला संभाजीनगर येथे आणून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला 5 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
दहशतवादविरोधी पथकास ऑगस्ट 2018 ते जानेवारी 2019 दरम्यान मुंबई, ठाणे आणि संभाजीनगर शहरातील गर्दीच्या ठिकाणी घातपात करण्याच कट उमत मोहम्मदीया ग्रुपने रचला असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी उमत मोहम्मदीया ग्रुपवर वॉच ठेवून संभाजीनगरातील पाच आणि मुंब्य्रातील चार अशा एकूण नऊ जणांना 22 जानेवारी रोजी अटक केली होती. हे नऊ जण सध्या पोलीस कोठडीत आहेत.
चौकशीदरम्यान एटीएसला उमत मोहमदीया ग्रुपच्या गुप्त बैठकीस सुरुवातीपासून हजेरी लावणाऱ्या तलाह ऊर्फ अबुबकर हनिफ पोतरीक (24 एमरॉल्ड टॉवर मुंब्रा) यांची माहिती मिळाली तसेच तो मुंब्रा येथे असल्याचेही समजले. तेव्हा त्याच्यावर एटीएसने वॉच ठेवून 26 जानेवारी रोजी सायंकाळी मुंब्य्रातून अटक केली. त्याच्या ताब्यातून एटीएसने लॅपटॉप, मोबाईल, पेनड्राइव्ह जप्त केला आहे.
संभाजीनगर ते मुंब्रा नेटवर्क
एटीएसच्या पथकाने मंगळवारी पहाटे संभाजीनगर आणि मुब्रा येथे एकाच वेळी छापा मारून मोहसीन सिराजुद्दीन खान (32, दमडी महल), महंमद मशाहिद उल इस्लाम (23, कैसर कॉलनी), महंमद सरफराज ऊर्फ अबू हमजा अब्दुल हक उस्मानी (23, राहत कॉलनी), महंमद तकी ऊर्फ अबू खालेद सिराजोद्दीन खान (20, कैसर कॉलनी) एक विधिसंघर्ष बालक, ठाण्यातील मुंब्रा येथील जमान नवाब खुटेउपाड (32, मुंब्रा ठाणे), सलमान सिराजुद्दीन खान (28, मोतीबाग, मुंब्रा ठाणे), फहाद महंमद इस्तियाक अन्सारी (अल्माश कॉलनी, मुंब्रा, ठाणे), मजहर अब्दुल रशिद शेख (21, मुंब्रा ठाणे) या नऊ जणांना ताब्यात घेतले होते.
मुंबईतही गुन्हा दाखल
पकडण्यात आलेल्या या सर्वांवर देशाबाहेर असलेल्या इसीसशी संबंधित व्यक्तीच्या ते संपर्कात असल्याची आणि प्रजासत्ताकदिन ते स्वातंत्र्यदिन या काळात ते पाण्यात विष कालवणार असल्याची माहिती मिळाली होती. नऊ जणांच्या अटकेनंतर कोठडीदरम्यान दहाव्या आरोपीचे नावही एटीएसला मिळाल्यामुळे त्यांनी 26 जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता तलाह याला मुंब्य्रातून अटक केली. पोलीस निरीक्षक विजयकांत जैस्वाल यांच्या तक्रारीवरून या दहाही जणांविरोधात भादंवि 120 ब, 18, 20, 38, 39 बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा 1967 सुधारणा 2004, 2008 सह 135 महाराष्ट्र पोलीस कायदा 1967 सुधारित 2008 नुसार मुंबईतील काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
कोणत्या जलकुंभात विष कालवणार होते?
इसिसशी संबंधित या तरुणांवर मुंबई, ठाणे आणि संभाजीनगरात ऑगस्ट ते जानेवारीदरम्यान घातपात कारवाया करण्याचा कट रचत असल्याचा आरोप असून तलाहही त्यांच्याशी संबंधित आहे. तेव्हा त्यांनी रासायनिक द्रव्य कुठून आणले, कोणत्या शहरातील जलकुंभामध्ये विषारी रासायनिक द्रव्य मिळविणार होते याची माहिती आता एटीएस मिळवणार आहे.
आजोबांच्या घरीच ‘तो’ रचत होता कट
मुंब्य्राच्या दोस्ती प्लॅनेट एमरॉल्ड टॉवरमध्ये आजोबांच्या घरी (आईच्या वडिलांकडेच) तलाह ‘दहशतवादी’ कट रचत होता. त्याच्यासोबत आजोबा, आई राहत असे तर वडील नोकरीच्या निमित्ताने दुबईत वास्तव्याला आहेत. तलाहने बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीचे शिक्षण घेतले असून त्याच्याकडून लॅपटॉप, पेनड्राइव्ह, हार्ड डिस्क असे साहित्य जप्त केल्याची माहिती एटीएसच्या अधिकाऱयांनी दिली.
























































