विद्यार्थी गिरवू लागले वृक्ष संवर्धनाचे धडे, पर्यावरणाच्या जनजागृतीसाठी पालिकेची मोहीम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वृक्ष संवर्धनासाठी झाड कसे लावावे, झाडांची निगा कशी घ्यावी, याबरोबर एकूणच पर्यावरणाविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी मुंबई महापालिकेने विशेष मोहीम सुरू केली आहे. महापालिका तसेच खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांचा या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या मोहिमेत शिक्षकांनाही रोप देऊन सत्कार करण्यात येत आहे.
मुंबई महापालिकेने पर्यावरण, वृक्षसंवर्धनात नेहमीच पुढाकार घेत राबवलेल्या उपक्रमांना जागतिक पातळीवर गौरवण्यात आले. मुंबईने देशातील दुसऱ्या क्रमांकाचा वृक्ष शहर असा जागतिक गौरव पटकावला.

मुंबईतील पर्यावरण संवर्धनासाठी, जैवविविधता कायम ठेवण्यासाठी महापालिका विविध झाडांची लागवड करून शहरी वने तयार करत आहे. त्यासाठी मियावाकीसारखा अनोखा उपक्रम राबवला जात आहे. त्याच्या जोडीला पर्यावरण संवर्धनात महत्त्वाची भूमिका बजावणार्या विद्यार्थ्यांच्या मनावर पर्यावरणाचे महत्त्व बिंबवावे, यासाठी महापालिकेच्या उद्यान खात्याकडून शालेय विद्यार्थ्यांना वृक्ष संवर्धनाचे धडे देणे सुरू केले आहेत. मुंबई महापालिकेच्या ‘आर/उत्तर’ विभाग येथे उद्यान खात्यामार्फत रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांना वृक्ष संवर्धन अभियानांतर्गत पर्यावरणाबद्दल जागरुकता निर्माण होण्यासाठी पर्यावरणाविषयी व वृक्षांविषयी माहिती देण्यात आली. त्याचबरोबर वृक्ष लागवडीचे महत्त्व, पर्यावरणीय बदल याबाबतचीदेखील माहिती देण्यात आली. मुलांमध्ये पर्यावरणाविषयी जागरुकता व आवड निर्माण करण्यासाठी मुलांना झाड कसे लावावे, संगोपन कशा प्रकारे करावे, रोप लावण्यासाठी कुंडी कशा प्रकारे तयार करावी, झाडांच्या बियांचे रोपण कसे करावे, याबाबत प्रात्यक्षिकाद्वारे माहिती देण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात खूप आवडीने सहभाग घेतला. शाळेतील शिक्षकांचा यावेळी रोप देऊन सत्कार करण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांना पर्यावरणाविषयी जागरुकता व आवड निर्माण करण्याबाबत महापालिकेच्यावतीने सातत्याने प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.

24 वॉर्डमध्ये खुली वाचनालये !
मुंबई महापालिकेच्या उद्यान विभाग सामुदायिक सामाजिक दायित्व (सीएसआर) व दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्यामध्ये मियावाकी पध्दतीने वृक्ष लागवड करणे, शहरी वने उभारणे, उद्यानांचा विकास करणे, उद्यानांमध्ये विविध सुविधा उभारणे तसेच महापालिकेतील 24 वॉर्डमधील एका उद्यानामध्ये खुले वाचनालय सुरू करण्यात येत आहे. यापैकी आतापर्यंत 4 खुली वाचनालये सुरू करण्यात आली आहेत.