नाना पाटेकर, मधु कांबीकर यांना महापालिकेत श्रद्धांजली; बहुरंगी व्यक्तिमत्त्व, जिवंत अभिनय आणि सामाजिक कार्याचा गौरव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या जिवंत अभिनयाने रसिकांच्या हृदयावर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेला प्रतिष्ठा मिळवून देणाऱया ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांना मंगळवारी महापालिकेच्या महासभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. कलेप्रती असलेली निष्ठा आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम असलेले नाना पाटेकर यांचे कार्य कायम स्मरणात राहील, अशा भावना सर्वपक्षीय सदस्यांनी व्यक्त केल्या.

नाना पाटेकर यांच्या निधनाने  हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीसह मराठी रंगभूमी, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करणारा प्रस्ताव सभागृहात मांडण्यात आला. ज्येष्ठ प्रतिभावंत कलाकारांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एका महत्त्वपूर्ण पर्वाचा अंत झाला आहे. त्यांच्या कार्याचा आणि कलाकृतींचा ठसा कायम स्मरणात राहील. असे महापौर रितू तावडे म्हणाल्या.

सभागृह नेते गणेश खणकर यांनी नाना पाटेकर आणि मधु कांबीकर यांचा शोकप्रस्ताव  मांडला. आपल्या कार्यातून समाजमनावर प्रभाव टाकणारे नाना कायम स्मरणात राहतील, अशा भावना खणकर यांनी व्यक्त केल्या. त्याला अनुमोदन देताना महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांनी नाना पाटेकर यांच्या प्रदीर्घ कलाप्रवासाचा, अभिनयातील वैशिष्टय़ांचा आणि सामाजिक बांधिलकीचा गौरव केला. शिवसेना नगरसेवक यशोधर फणसे  यांनी नाना यांच्या जाण्याने एका चांगल्या मित्राला, एका चांगल्या सल्लागाराला गमावल्याची भावना व्यक्त केली.

नानांनी जीवनात खूप संघर्ष केला.  ते परखड बोलणारे व्यक्तिमत्त्व होते, असे शिवसेना नगरसेविका श्रद्धा जाधव म्हणाल्या. नाना कलाकार म्हणून आणि माणूस म्हणून महान होते, असे काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी म्हणाले.

नाना पाटेकर यांचा रंगभूमी ते चित्रपट असा प्रवास विलक्षण होता. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. पण प्रतिष्ठsचा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार मिळालेला नाही. त्यांना मरणोत्तर हा पुरस्कार मिळावा, अशी चाहत्यांची भावना असल्याचे मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार म्हणाले.