नाणेघाट सुशोभिकरणाच्या कामात भ्रष्टाचार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोपाळ पवार। मुरबाड

प्राचीन काळी दख्खन व कोकण यांना जोडणारा सह्याद्री पर्वतामधील जुन्नर व मुरबाड तालुक्याच्या मधोमध असणाऱ्या शिवकालीन नाणेघाटाच्या सुशोभीकरणाच्या कामात ठेकेदारांनी वनाधिका-यांच्या संगनमताने काम न करताच बिले काढल्याचा धक्कादायक प्रकार मुख्य वनसंरक्षक ठाणे यांनी नियुक्त केलेल्या दक्षता समितीच्या चौकशीत उघड झाला असून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारणी साठी ज्या नाणेघाटातून नेहमी प्रवास केला व त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या घाटात ठेकेदार व वनाधिकारी यांनी केलेल्या लाखो रूपयांच्या भ्रष्टाचारामुळे शिवप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे.

प्राचीन काळी दख्खन चा प्रदेश व कोकण यांना जोडण्यासाठी शिवनेरी किल्ल्याच्या जवळच सह्याद्री पर्वत फोडून पाय-यांचा घाटरस्ता बनविला होता. या घाटरस्त्यावरून लोकांचे जाणे येणे व व्यापारी आपला माल घोड्यांवरून नेआण करीत असत . त्या काळी येथे एक दगडाचे मोठे रांजण बांधून ठेवण्यात आले होते. त्यामध्ये जकात म्हणून व्यापाऱ्यांना एक नाणे या रांजनात टाकावे लागे. त्यामुळे या घाटाला ” नाणेघाट ” असे नाव पडले. छत्रपती शिवाजी महाराजही आपल्या सैनिकांसह स्वराज्य निर्मितीसाठी याच घाटातून जात. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या घाटांतील सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. याकरिता आमदार किसन कथोरे यांनी प्रयत्न केल्याने शासनाने वनविभागाच्या माध्यमातून येथील विकासकामे मंजूर केली. ही कामे आयुष कन्स्ट्रक्शन भांडूप मुंबई, निलांजन इंटरप्रायझेस कळवा ठाणे व दत्त कन्स्ट्रक्शन कल्याण यांना मंजूर केली. मात्र या ठेकेदारांनी पदपथावरील पाय-या या घडीव दगडाच्या बनवायच्या ऐवजी तेथीलच झिजलेल्या निकृष्ट दर्जाचा वापरून बनविल्या. हा दगड २६ कि.मी.वरून आणावा असे अंदाजपत्रकात असून देखील कोणतीही वाहतूक न करता बिले काढली. याप्रकरणी जिल्हा परिषद सदस्य सुभाष आप्पा घरत यांनी मुख्य वनसंरक्षक ठाणे आर.एस.कदम यांच्या कडे तक्रार दाखल करून टोकावडे वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल तुळशीदास हिरवे यांच्या संगनमताने ७५ लाख रुपयांचा भ्रष्टाचार ठेकेदारांनी केल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली होती. त्यानुसार मुख्य वनसंरक्षक कदम यांनी विभागीय दक्षता समिती नेमून चौकशी केली. त्या चौकशी अहवालात भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट नमूद केले आहे.

अहवालातील निष्कर्ष

ठेकेदार व वनाधिकारी यांनी माँर्टर विरहित घडीव दगड पाय-यांच्या बांधकामात वापरल्याची नोंद मोजमाप पुस्तिकेत करण्यात आली आहे. पण प्रत्यक्षात जागेवरच उपलब्ध असलेल्या निक्रुष्ट दर्जाच्या दगडांचा वापर केला आहे.

पाय-या लगतच्या भिंती ट्राय रँडम रबलद्वारे बांधल्याचे दर्शविण्यात आले असून प्रत्यक्ष जागेवर भिंतीसाठी झिजलेल्या दगडांचा वापर केला आहे.

नाणेघाटातील पायवाटेच्या ठिकाणी प्रत्यक्षात कुठलेही खोदकाम नं करताना भिंतीसाठी खोदकाम केल्याची नोंद करण्यात आली आहे.

अंदाजपत्रकीय दरानुसार दगडांची वाहतूक २६ कि.मी.अंतरावरून केल्याचा दावा ठेकेदारांनी केला आहे.वास्तविक बाहेरून दगड न आणता स्थानिक निक्रुष्ट दगडच वापरल्याने वाहतुकीचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे म्हटले आहे.