
मोबाईल चोरीच्या एका घटनेवरून बिहारच्या मधुबनीमध्ये एका शाळेच्या संचालकांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेचा शिताफीने तपास करत हत्येचा छडा लावत पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. शाळेच्या संचालकांनी मोबाईल चोरांना प्रतिकार केल्यामुळे त्यांना जीव गमवावा लागला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून चोरलेला मोबाईल, सिमकार्ड आणि हत्येसाठी वापरलेला चाकू जप्त करण्यात आला आहे.
मोबाईल चोरीला प्रतिकार करत चोरट्यांचा पाठलाग करणारे मधुबनीतील एका शाळेचे संचालक रवींद्र चौधरी यांची चोरट्यांनी भोसकून हत्या केली होती. ही घटना 24 ऑक्टोबरला मधुबनीतील झंझापूरमध्ये घडली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपसाला सुरुवात केली. पोलिसांनी चौधरी यांचा मोबाईल सर्विलान्सवर ठेवला. त्यामुळे मोबाईल आणि सिम वापरल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
मोबाईलच्या लोकेशनचा शोध घेत पोलिसांनी दीप गावातील गौतम पांडे, राहुल कुमार आणि गौरीशंकर यांना अटक केली. त्यांनी चौधरी यांची हत्या केल्याची कबूली दिली. शाळेचे संचालक रवींद्र चोधरी कानपूरचे असून मधुबनीमध्ये खासगी शाळा चालवत होते.
हत्येनंतर त्यांच्या भावाने दुसऱ्या दिवशी तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात करत चौधरी यांचा मोबाईल सर्व्हिलान्सवर लावला. त्यामुळे चोरट्यांनी चौधरी यांचा चोरलेला मोबाईल आणि सिम वापरताच पोलिसांना सूचना मिळाली. चौधरी यांच्या चोरलेल्या मोबाईलच्या मदतीने पोलिसांनी चोरट्यांना अटक केली.
चौधरी मोटरसायकलने जात असताना त्यांना फोन आल्याने दुचाकी थांबवून ते फोनवर बोलत होते. त्यावेळी चोरट्यांनी चौधरी यांचा मोबाईल हिसकावत पळ काढला. चोधरी यांनी त्यांचा पाठलाग केला. पुढे गेल्यावर रस्ता बंद असल्याने चोरट्यांना थांबावे लागले. तोपर्यंत चौधरीही तिथे पोहचले. त्यांनी चोरट्यांचा प्रतिकार केला. त्यांच्यात आणि चोरट्यांमध्ये हाणामारी झाली. चोरट्यांनी चाकूने भोसकत रवींद्र यांची हत्या केली आणि फरार झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. या हत्येचा उलगडा करत चोरट्यांना अटक केल्यामुळे पोलिसांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

























































