करवीर तालुक्यात लायटिंग लावण्यावरून तरुणाचा खून; आरोपीला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्वत्र मोठय़ा उत्साहात नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत असतानाच मंडपात लायटिंग लावण्याच्या क्षुल्लक कारणातून तरुणाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. करवीर तालुक्यात खेबवडे येथे शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली. हत्येनंतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला असून करवीर पोलिसांनी त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

वैभव साताप्पा भोपळे (वय 25, रा. लोहार गल्ली खेबवडे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. सूरज सातापा पाटील (वय 25, रा. खेबवडे) असे आरोपीचे नाव आहे. हा सकाळी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र नवरात्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. करवीर तालुक्यातील खेबवडे छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवशंभो तरुण मंडळाकडूनही नवरात्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. सूरज पाटील याने आपली लायटिंग सोडून दुसऱयाची लायटिंग लावल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांशी वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी वैभव भोपळे याने समजावण्याचा प्रयत्न केला असता, संतप्त सूरज पाटील याने त्याच्यावर चाकुचा हल्ला केला. यानंतर सकाळी तो करवीर पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक केली आहे.

मिरजेत पूर्ववैमनस्यातून वीटभट्टी कामगाराचा खून
पूर्ववैमनस्यातून वीटभट्टी कामगाराचा खून करण्यात आल्याची घटना शनिवारी दुपारी हरिपूर येथे घडली. याबाबत सांगली ग्रामीण पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. विक्रम वाघमारे (रा. हरिपूर, ता. मिरज) असे मृताचे नाव आहे.

हरिपूर येथील वाघमारे आणि पिंगळे कुटुंबात गेल्या अनेक वर्षांपासून वाद आहे. या वादातून न्यायालयात खटलाही चालू आहे. शनिवारी दुपारी 12 वाजता विक्रम वाघमारे हा पिंगळे यांच्या घरासमोर जाऊन गोंधळ घालत होता. न्यायालयातील खटला काढून घेण्याची मागणी करत गोंधळ घालत असताना मारामारी सुरू झाली. यात वाघमारे यांचा खून झाला. सांगली ग्रामीण पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे.