मालाडच्या उद्यानात म्युझिकल वॉक, ओपन जीम, योग, मुलांसाठी खेळणी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संगीताचा आस्वाद घेत करता येणारा ‘म्युझिकल वॉक’, ओपन जीम, योग, ज्येष्ठांना गप्पांसाठी व्यवस्था आणि मुलांसाठी खेळणी अशा अनेक सुविधा असणारे मालाड येथील स्वर्गीय राजीव गांधी उद्यान सध्या मुंबईकरांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. तब्बल 13,280 चौरस मीटर जागेत हे उद्यान उभारण्यात आले आहे.

मुंबई स्वच्छ-सुंदर करण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून उद्याने, मैदानांचा कायापालट करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मालाड पश्चिम येथील उद्यानाला नवे रूप देण्यात आले आहे. या ठिकाणी जॉगिंग, योगा करण्यासाठी येणाऱया नागरिकांना श्रवणीय संगीताचा आनंद घेता येत आहे. यासाठी उद्यानाच्या चारही बाजूंना अद्ययावत संगीत यंत्रणा बसविण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा म्हणून गजेबो बसवण्यात आला आहे. दर्जेदार जॉगिंग वॉकसह झाडांभोवतीही आकर्षक कठडे तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी सकाळ-संध्याकाळ सुमारे दोन हजार रहिवासी या सुविधेचा लाभ घेत असल्याचे ‘पी/उत्तर’चे सहायक उद्यान अधीक्षक हनुमंत गोसावी यांनी सांगितले.

उद्यानात सर्व वयोगटांसाठी सुविधा

उद्यानात सुविधा उभारताना लहान मुले, जॉगिंगसाठी येणारे मध्यमवयीन आणि ज्येष्ठ असा सर्वसमावेशक विचार करून सुविधा उभारण्यात आल्या आहेत. यामध्ये लहान मुलांसाठी खेळण्यांसोबत ओपन जीमही तयार करण्यात आली आहे. उद्यानातच शौचालयाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. निसर्गाची अनुभूती देणारी मोठी झाडे, शोभेची झाडे आणि हिरव्यागार गालिच्यामुळे मालाडचे हे उद्यान रहिवाशांसाठी पर्वणीच ठरत आहे.