गतिमंद मुलीवर अत्याचार करणारा ‘केसावरून’ सापडला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो प्रातिनिधीक

सामना ऑनलाईन, मुंबई

गतिमंद मुलीवर अत्याचार करून पळालेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट 12 ने गुरुवारी अटक केली. खुर्शीद ऊर्फ शोएब शहाबुद्दीन अहमद कासार असे त्याचे नाव आहे. विचारपूसदरम्यान मुलीने स्वतःच्या केसावरून हात फिरवला. हाच धागा पकडून पोलिसांनी तपास करून खुर्शीदच्या मुसक्या आवळल्या. खुर्शीदला पुढील कारवाईकरिता कुरार पोलिसांच्या ताब्यात दिले.

पीडित मुलगी ही मालाड परिसरात राहते. साहित्य आणण्याकरिताच ती घराबाहेर पडायची. याचाच फायदा खुर्शीदने घेतला. चार महिन्यांपूर्वी खुर्शीदने मुलीला मालाड येथील एका निर्जनस्थळी नेले. तेथे नेऊन तिच्यावर अत्याचार केला होता. गेल्या आठवडय़ात मुलीच्या आईने कुरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या गुह्याचा समांतर तपास युनिट 12 चे अधिकारी करत होते. सहायक आयुक्त अभय शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक सुनील जाधव, पोलीस निरीक्षक सचिन गवस, सहायक निरीक्षक अतुल आव्हाड, विजय कदम, पोलीस नाईक संतोष गायकवाड, अनंत मोरे, खोत, आव्हाड, महिला पोलीस नाईक अश्विनी देवळेकर यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपास करून गुरुवारी पोलिसांनी खुर्शीदला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने अत्याचाराची कबुली दिली.

…अन् फिरली तपासाची चक्रे

पीडित मुलगी गतिमंद आहे. तिला नीट बोलताही येत नव्हते. जेव्हा आरोपी कोण याबाबत तिला विचारले तेव्हा तिने स्वतःच्या केसावरून हात फिरवला. हाच धागा पकडून पोलिसांनी तपास सुरू केला. संशयित हा सलूनमध्ये काम करणारा असावा हे स्पष्ट झाले. पोलिसांनी मालाड परिसरातील पाच-सात सलूनमध्ये चौकशी केली तेव्हा खुर्शीदची माहिती पोलिसाना मिळाली.

भीतीपोटी पळाला गावी

खुर्शीद हा एका सलूनमध्ये काम करत होता. तो तीन महिन्यांपूर्वी नोकरी सोडून गेला होता. पोलीस पकडतील या भीतीने तो दोन महिन्यांपासून उत्तर प्रदेशमध्ये लपून बसला होता.