
सामना प्रतिनिधी । हिंगोली
शाळेसाठी प्लॉट घेण्याकरिता वडिलांकडून पैसे घेऊन येण्यास तसेच दुसऱ्या लग्नाला नकार दिल्यामुळे हिंगोली शहराच्या आजम कॉलनी भागातील एका मुस्लीम शिक्षकाने पत्नीला लोखंडी रॉडने अमानुष मारहाण केली. या प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या शिक्षकासह त्याच्या दोन बहिणी व भाच्याविरुध्दही गुन्हा नोंदविल्याचे पोलिसांनी सांगितले.
हिंगोली शहराच्या आजम कॉलनी भागातील पिडीत महिला शमा सदफ सय्यद मुर्तुजा यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे की, त्यांचे पती सय्यद मुर्तजा हे स्कॉलर इंग्लीश स्कूल चालवितात. आम्हाला चार आपत्य असून पती सय्यद मुर्तुजा सय्यद अकबर हे शाळेसाठी प्लॉट घेण्याकरिता वडिलांकडुन पैसे घेऊन ये व दुसरे लग्न का करु देत नाही म्हणून सतत शारीरिक व मानसिक त्रास देत होते. 3 जुलै रोजी माझ्या दोन नणंदा व नणंदेचा मुलगा सय्यद आसीफ सय्यद अमीन हे आजम कॉलनी येथील घरी आले. यावेळी या तिघांनी चिथावणी दिल्यामुळे सय्यद मुर्तजा यांनी मला लोखंडी रॉडने पायावर जबर मारहाण केली. तसेच डावा पाय फॅक्चर केला. डोके भिंतीवर आदळल्याने मुका मार लागला आहे असेही शमा सदफ सय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे.
दरम्यान, या पीडित महिलेवर शिवाजीनगर भागातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या महिलेचा जवाब नोंदवुन घेऊन पतीसह चौघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.


























































