पाच कोटींचे दोन माणिक घेऊन बनावट हिरे दिले, म्यानमारच्या व्यापाऱ्याची शिताफीने फसवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत म्यानमारच्या हिरे व्यापाऱ्याची पाच कोटींची फसवणूक करणाऱ्या टोळीचा छडा डॉ. डी. बी. मार्ग पोलिसांनी 12 तासांत लावला आहे. पाच कोटींचे माणिक घेऊन त्या व्यापाऱ्याला किमती हिरे देण्याचा सौदा ठरला होता, मात्र आरोपींनी माणिक घेऊन व्यापाऱ्याला बनावट हिरे दिले होते.

ये मिन ऐम एच अली मोहम्मद दादाभाई (58) असे त्या म्यानमारच्या व्यापाराचे नाव आहे. वर्षभरापूर्वी हिरे खरेदी-विक्री करणाऱ्या उदय चोक्सी यांच्याशी ये मिन यांची समाजमाध्यमातून ओळख झाली होती. दोघे ऑनलाइनच संपका&त होते. चार महिन्यांपूर्वी दोघे जयपूरला भेटले. तेथे दोघांमध्ये माणिकच्या बदल्यात हिरे देण्याचे ठरले. त्यानुसार मंगळवारी ग्रॅण्ट रोडच्या पंचरत्न इमारतीत ये मिन आणि उदय चोक्सी, सुरेश बोराड, खेताराम देवासी, विंकल शहा, प्रवीण जैन असे एकत्र एका खोलीत भेटले. उदय याने काही हिरे ये मिन यांना बघण्यासाठी दिले. यावेळी त्यांना बोलण्यात गुंतवून आरोपींनी शिताफीने हातचलाखी करत ये मिन यांच्याकडील पाच कोटी किमतीचे माणिक काढून घेतले. मग बनावट हिरे त्यांना देऊन पळ काढला. आपली फसवणूक झाल्याचे स्पष्ट होताच ये मिन यांनी डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात धाव घेतली. खबऱ्यांच्या मदतीने ये मिन यांचे पाच कोटींचे माणिक चोरून पळालेल्या उदय चोक्सी, सुरेश बोराड, खेताराम देवासी, विंकल शहा या चौघांना पोलिसांनी 12 तासांच्या आत हिऱ्यांसह पकडले. यातील उदय, विंकल व सुरेश यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. यातील तीन आरोपी मुंबईबाहेर पळण्याच्या तयारीत होते, मात्र पोलिसांनी सर्वांच्या मुसक्या आवळल्या.