‘नाळ’चा बॉक्स ऑफिसवर दणका; पहिल्या आठवड्यात केली 14 कोटींची विक्रमी कमाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

…आणि डॉ. काशीनाथ घाणेकर’ सिनेमापाठोपाठ नागराज मंजुळे यांचा ‘नाळ’ हा सिनेमादेखील आता बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. सुधाकर रेड्डी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘नाळ’ या चित्रपटाने रसिकांवर अक्षरशः जादू केली आहे. लहानग्या चैतन्यच्या भावविश्वाने प्रेक्षकांच्या थेट काळजाला हात घातला असून पहिल्या आठवड्यातच या सिनेमाने 14 कोटींची घसघशीत कमाई करत आपला आणि प्रेक्षकांचा पैसा वसूल केला आहे.

‘सैराट’पाठोपाठ पहिल्याच आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरून एक नवा विक्रम रचलाय. मुंबई-पुण्यासह नाशिक, संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर आणि इतर शहरांमध्येही या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळतोय. याशिवाय महाराष्ट्रासह हा चित्रपट इतर राज्यांतही प्रदर्शित झाला असून तमीळ आणि मल्याळम भाषिक चित्रपटांची मक्तेदारी असणाऱ्या चेन्नई आणि बंगळुरू इथेही प्रेक्षकांची हाऊसफुल्ल गर्दी खेचण्यात ‘नाळ’यशस्वी झाला आहे.

‘नाळ’च्या या यशाबद्दल दिग्दर्शक सुधाकर रेड्डी म्हणाले, ‘नाळ’ हा चित्रपट बनवणं हे माझं स्वप्न होतं. हा चित्रपट बनवताना तो प्रत्येकाला भिडावा असाच आमचा उद्देश होता. आज ‘नाळ’ ला मिळालेलं यश पाहता आम्ही आमच्या उद्देशात यशस्वी झालोय असं वाटतंय याचा मला आणि पूर्ण टीमला खूप आनंद होतोय. ‘नाळ’चे निर्माते आणि अभिनेता नागराज मंजुळे म्हणाले, ‘सर्वसामान्य माणसांचं जगणं रुपेरी पडद्यावर मांडणाऱ्या, लोकभाषेत अभिव्यक्त होणाऱ्या एका साध्या तरीही तरल कथेला प्रेक्षकांनी दिलेला हा उदंड प्रतिसाद म्हणजे रसिकांच्या अभिरुची संपन्नतेची पावती आहे.