अधिकाऱ्याच्या अंगावर डंपर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। नगर

अनाधिकृत मुरुमाची उत्खनन करून वाहतुक करणाऱ्या वाहनचालकाने मालकाच्या चिथावणीवरुन महसुलच्या उपविभागीय अधिकारी उज्वला गाडेकर व त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांवर तपोवन रोड येथे डंपर अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी उप विभागीय अधिकारी कार्यालयातील लिपिक अशोक सुर्यभान मासाळ यांच्या फिर्यादीवरुन डंपरचा मालक हयातखान दिलावरखान पठाण तसेच आसिर पठाण, समीर पठाण, युसूफ पठाण, निसार पठाण, अज्जू (सर्व रा.तोफखाना) यांच्यावर तोफखाना पोलीस स्टेशनला रविवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उप विभागीय अधिकारी उज्वला गाडेकर यांना अवैध गौण खनिज उत्खनन करुन तपोवन रोड येथून वाहतूक चालत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी रविवार 27 जानेवारी रोजी दुपारी आपल्या कार्यालयातील कर्मचारी अशोक मासाळ यांना इंद्रायणी हॉटेल समोर तपोवन रोड येथे बोलावून घेतले. तर दोन पंच म्हणून बलविंदर सोनी व बासुदेव मुजुमदार उपलब्ध केले. दुपारी 3 च्या दरम्यान औरंगाबाद रोडकडून सफेद रंगाचा एम.एच.17 एजी 6836 हा मुरुमने भरलेला डंपर तपोवन रोडच्या दिशेने जाताना दिसला. गाडेकर यांनी सदर डंपर थांबवून चालकास परवाना व मुरुम कुठून आणल्याची विचारणा केली . पण त्याला उत्तर देता आले नाही. त्याला वाहन तहसिल कार्यालयात घेऊन जाण्यास सांगितले असता त्याने नकार दिला.

यामुळे गाडेकर यांनी कापूरवाडी तलाठी यांना बोलावून घेतले. तसेच डंपरचालकाने मालकाला बोलावले असता त्याच्याबरोबर 5 ते 6 इसम आले. कापूरवाडी तलाठींनी डंपर मालकासह इतरांना ओळखले. त्यांनी परवान्याची विचारणा केली असता सर्वजण आरडा-ओरडा करुन शिवीगाळ करू लागले. तर डंपर चालकास मालकाने डंपर कारवाईसाठी आलेल्या महसूलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अंगावर घालण्याची चिथावणी दिली. डंपरचालकाने सदर डंपर उपविभागीय अधिकारी गाडेकर यांच्यासह त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांच्या अंगावर घातला. प्रसंगावधान राखून ते बाजूला सरकल्याने पुढील अनर्थ टळला. तर डंपरच्या मागे मालकासह आलेले इतर 5 ते 6 इसम मोटार सायकलवरुन पसार झाले. सदर डंपर औरंगबाद रोड येथील हॉटेल मोगरा समोर पुन्हा अडविण्यात आल्याने डंपर मालकासह इतर इसमांनी हुज्जत घालून बनावट परवान्याची पावती दाखवली. तर सदर डंपर तहसिल कार्यालयाकडे घेऊन जाण्यास विरोध करुन, आरडा-ओरड करीत उपस्थित अधिकारी व कर्मचार्यांच्या दिशेने दगडे भिरकावली. या घटनेचे मोबाईलद्वारे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला असता सदर आरोपींनी मोबाईल हिसकावून जमीनीवर आपटून फोडल्याचे फिर्यादीत मासाळ यांनी म्हंटले आहे. याप्रकरणी वरील आरोपींवर भादवि 307, 308, 379, 143, 147, 465, 420, 353, 427, 504, 506 तसेच मुंबई पोलीस अधिनियम 37 (1), (3), पर्यावरण संरक्षण अधिनियम 8, 15 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास सहा.पो.नि. प्रकाश अधिकराज करीत आहे.