
पारनेर तालुक्यातील जवळा येथील अल्पवयीन मुलीचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे शवविच्छेदनात निष्पन्न झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी दिली. हत्या करण्यापूर्वी मुलीवर अत्याचार झाला असावा, असा संशय शवविच्छेदन अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. याची खातरजमा करण्यासाठी मुलीचा व्हिसेरा नाशिक येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे.
अत्याचार करून मुलीची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करीत जवळे ग्रामस्थांनी आज कडकडीत बंद पाळला. शिरूर-बेल्हे मार्गावर दीड तास रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी महिलांनी पारनेर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. दरम्यान, मुलीच्या अंगावर जखमा व ओरबडल्याच्या खुणा आढळल्याने प्रकार घडत असताना मुलीने मोठा प्रतिकार केला असल्याचे शवविच्छेदनातून पुढे आले आहे.
पारनेर तालुक्यातील जवळे येथे बुधवारी अल्पवयीन मुलीचा मृतदेह संशयास्पदरीत्या घरात आढळला होता. मुलीचे नातेवाईक व ग्रामस्थांनी मुलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केल्याने मृतदेह शवविच्छेदनासाठी नगर जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला होता. आज सकाळी न्यायवैद्यक तज्ञांच्या मदतीने शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर दुपारी मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आमदार नीलेश लंके यांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभ आगरवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.
अवैध दारूविक्री बंद करण्याची मागणी
जवळे येथे अवैध दारूविक्रीसह इतर अवैध व्यवसाय फोफावले आहेत. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ झाली आहे. त्यातूनच मुलीवर अत्याचार करून तिची हत्या झाल्याचा आरोप सरपंच अनिता आढाव यांनी केला. यावेळी महिलांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. येत्या दहा दिवसांत हत्येचा तपास लागला नाही, आरोपींना अटक झाली नाही तर मुलीचा दशक्रिया विधी जवळे बसस्थानकासमोर करण्याचा इशारा महिलांनी दिला आहे.




























































