
नगर अर्बन बँकेतील 2014 ते 2019 या पाच वर्षांच्या लेखा परीक्षण अहवालातून बँकेची सुमारे दीडशे कोटींची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने बँकेच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. आता दाखल झालेल्या गुह्यात पोलीस काय कारवाई करणार, याकडे बँकेच्या वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
नगर अर्बन बँकेतील गैरव्यवहारांमुळे सभासदांना लाभांश मिळणे बंद झाले आहे. तसेच बँकेच्या ठेवीदारांना व खातेदारांना त्यांनी बँकेमध्ये विविध योजनांमध्ये गुंतविलेल्या ठेवींचा परतावा तसेच ठेवींची रक्कम व त्यांच्या इतर खात्यांमधील रकमा त्यांना परत मिळालेल्या नाहीत. त्यामुळे बँकेच्या गेल्या सहा वर्षांचा लेखापरीक्षण अहवाल व रिझर्व्ह बँकेच्या तपासणी अहवालाच्या प्रती प्राप्त करून घेऊन राजेंद्र गांधी यांनी त्याचे अवलोकन केले. त्यात नगर अर्बन बँकेत आजपर्यंत संचालक मंडळ, वरिष्ठ अधिकारी, काही कर्जदार व इतर संबंधित व्यक्तींनी कोटय़वधी रुपयांचा गैरव्यवहार करून बँकेचे मोठे नुकसान केल्याचे दिसून आले आहे. बँकेवर कारवाई होण्यासाठी दिल्लीतील सेंट्रल रजिस्ट्रार व रिझर्व्ह बँकेचे मुंबईतील मुख्यालय व नगर जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे गांधी यांनी पत्रव्यवहार केले आहेत.
बँकेतील 23 कोटींचे कर्ज प्रकरण, चिल्लर घोटाळा, बनावट सोनेतारण घोटाळा, पिंपरी-चिंचवड शाखेतील 22 कोटींच्या कर्ज प्रकरणातील फसवणुकीबाबत गुन्हे दाखल आहेत. या चार गुह्यांसह बँकेत आणखीही गैरव्यवहार झाले आहेत. बँकेचा लेखापरीक्षण अहवाल व रिझर्व्ह बँकेच्या तपासणी अहवालावरून बँकेतील 28 प्रकरणांमध्ये तब्बल 150 कोटींची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. ही सर्व प्रकरणे गंभीर व फौजदारी स्वरूपाची आहेत. त्यामुळे सविस्तर तपास होऊन या कर्ज प्रकरणांची तपासणी होणे आवश्यक आहे. त्यानंतर नगर अर्बन बँकेतील झालेल्या गैरव्यवहारांची निश्चित रक्कम निष्पन्न होईल, असे गांधी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.



























































