सोलापूर विद्यापीठ नामकरणात घोडचूक : वा. ना. उत्पात यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पंढरपूर

सोलापूर विद्यापीठाचे नामकरण करताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असे चुकीचे करण्यात आले असून ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये अहल्या असे नाव असल्याची माहिती भागवताचार्य तसेच जेष्ठ अभ्यासक वा. ना. महाराज उत्पात यांनी दिली. तसेच पुण्यश्लोक हा शब्द पुल्लींगी असल्याने विद्यापीठाचे नाव “पुण्यश्लोकी अहल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ” असे करा, असा सल्ला दिला.

सोलापूर विद्यापीठाला अहिल्या देवी यांचे नाव देण्याची मागणी अनेक वर्षापासून होती. राज्य सरकारने आचार संहितेपूर्वी घाईघाईने ती मान्य केली व बुधवारी नामकरणाचा कार्यक्रम देखील पार पडला. या पार्श्‍वभूमिवर बोलतांना वा. ना. महाराज उत्पात म्हणाले की, अहिल्या मधील अहि म्हणजे सर्प तर ल्या म्हणजे आणणारी असा होतो. याउलट अहल्या याचा अर्थ जीवनामध्ये, जगामध्ये प्रकाश आणणारी असा दिव्य अर्थ आहे. परंतु अपभ्रंश तसेच इतिहासाची माहिती नसल्याने सर्वत्र अहल्या ऐवजी अहिल्या असा चुकीचा नामप्रयोग करतात. त्यामुळे तो चुकीचा शब्द प्रचलित झाला आहे. मात्र विद्यापीठाने याचा अभ्यास करून नाकरण करणे अपेक्षित होते. याची दुरुस्ती विद्यापीठांने करायला हवी होती अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

इतिहासातील अनेक कागदपत्रात अहल्या हाच शब्द आढळून येतो. पेशव्यांच्या पत्रात गंगाजल समान पवित्र मातोश्री अहल्यादेवी असा उल्लेख आहे. दासगणू महाराजांनी अहल्याबाईंच्या जीवनावर कीर्तन कथा लिहिली आहे. त्यातही अहल्या असाच उल्लेख आहे. इतिहासकार दत्तो वामन पोतदार यांच्या लेखाचे शिर्षकच अहल्यादेवी असे आहे. मी लिहिलेल्या पुस्तकाचे नाव देखील अहल्यादेवी असेच आहे. सोलापूर विद्यापीठात मराठी, इतिहास आणि संस्कृतचे अनेक प्राध्यापक आहेत. त्यांच्या ही गोष्ट कशी लक्षात आली नाही असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, याबाबत आपण जेष्ठ नेते गणपतराव देशमुख, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे माजी अध्यक्ष अण्णा डांगे यांच्याशी संपर्क साधून सदर चूक निर्दशनास आणली आहे. त्यांनी याबाबत पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन दिले असल्याचे उत्पात यांनी सांगितले.