34 चेंडूंत शतक; साधे अर्धशतकही नसलेल्या यान इटनचा विश्वविक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

साधे एक अर्धशतकही नावावर नसलेला नामिबियाचा डावखुरा फलंदाज यान निकोल लॉफ्टी इटनने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये थेट सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा विश्वविक्रम केला. त्याने नेपाळविरुद्धच्या सामन्यात अवघ्या 33 चेंडूत शतक झळकावले. त्याने 34 चेंडूंत शतक ठोकणाऱया नेपाळच्या कुशल मुल्लाचा विश्वविक्रम आज मोडीत काढला.

नामिबिया संघासाठी पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या निकोलने अशी फलंदाजी केली की अनेक महान खेळाडूंचे विक्रम मागे पडले. या फलंदाजाच्या शतकी खेळीमुळे संघाने नेपाळविरुद्ध 4 बाद 206 धावा फटकाविल्या. यान निकोल लॉफ्टी इटनने 36 चेंडूत 101 धावांची खेळी करताना 11 सणसणीत चौकारांसह 8 टोलेजंग षटकार मारले. या खेळीत त्याने तब्बल 92 धावा चौकार-षटकारांनिशी काढल्या. हासुद्धा एक विक्रमच आहे. या लक्ष्याचा पाठलाग करताना यजमान संघाला 186 धावसंख्येपर्यंतच मजल मारता आली. नेपाळच्या कुसल मल्लाने गतवर्षी मंगोलियाविरुद्ध 34 चेंडूत वेगवान शतक ठोकून दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर, हिंदुस्थानचा कर्णधार रोहित शर्मा व श्रीलंकेचा सुदेश विक्रमसेकरा या स्टार खेळाडूंचे विक्रम मोडले होते. या तिघांनीही 35 चेंडूंत टी-20 शतक ठोकले आहे. आता नामिबियाच्या यान निकोल लॉफ्टी इटनने या सर्वांना मागे टाकून वेगवान टी-20 शतकाचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला.