आरक्षण संपुष्टात आणणे हीच भाजपची भूमिका, आरक्षणाचा प्रश्न फक्त काँग्रेस पक्षच मार्गी लावू शकतो – नाना पटोले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
NANA-PATOLE

मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असतानाच मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये, अशी मागणीही जोर धरत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजप फक्त राजकारण करत असून त्यांना कोणालाही आरक्षण द्यायचे नाही. आरक्षण संपुष्टात आणणे, हीच भाजपची भूमिका आहे. आरक्षणाचा प्रश्न फक्त काँग्रेसच मार्गी लावू शकतो, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. तसेच या मुद्द्यावरून भआजपवर टीकाही केली आहे.

आरक्षणाच्या प्रश्नावर भाजप व देवेंद्र फडणवीस मराठा व ओबीसी समाजाची दिशाभूल करत आहेत. फडणवीस ओबीसी समाजासमोर एक भूमिका मांडतात तर मराठा समाजाबद्दल दुसरी भूमिका मांडतात. आरक्षणाचा प्रश्न फक्त काँग्रेस पक्षच मार्गी लावू शकतो. भाजपला कोणालाही आरक्षण द्यायचे नाही, आरक्षण संपुष्टात आणणे हीच त्यांची भूमिका आहे, असा हल्लाबोल नाना पटोले यांनी भाजपवर केला आहे.

नाना पटोले म्हणाले की, आरक्षण प्रश्नावरून जालना जिल्ह्यातील एका मराठा तरुणाने मुंबईत आत्महत्या केली ही अत्यंत दुःखद घटना आहे. आरक्षण प्रश्नावर कोणीही आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचले नये. भाजप 2014 साली खोटी आश्वासने देऊन सत्तेत आला आहे. जनतेची दिशाभूल करण्याचे काम भाजप सातत्याने करत आहे. त्यांच्या भूलथापांना जनतेने बळ पडू नये. देवेंद्र फडणवीस सरकारने सांगितल्याप्रमाणे 2019 च्या सुनावणीत आपण न्यायालयात बाजू मांडली नाही, असे फडणवीस सरकारच्या वेळचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनीच जाहीरपणे सांगितले आहे. केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असतानाही आरक्षण न देता केवळ पोकळ आश्वासने दिली जात आहेत. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागायचा असेल तर 50 टक्क्यांची मर्यादा हटवावी लागेल आणि त्याचा निर्णय केंद्र सरकारला घ्यावा लागतो. जातनिहाय जनगणना केल्यास आरक्षणाचा प्रश्न सुटण्यास मदत होईल म्हणून काँग्रेस पक्ष जातनिहाय जनगणना करण्याची आग्रही मागणी करत आहे, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.

राज्यात ड्रग्जच्या प्रश्नावर काँग्रेस पक्षाने आधी आवाज उठवला होता, त्यावेळी सरकार झोपलेले होते. ललित पाटील या ड्रग माफियाला अटक केल्यानंतर आता सरकारला जाग आली आहे. फडणवीस आता बोलत आहेत. गृहखाते तुमच्याकडे आहे, सरकार तुमचे आहे मग चौकशी का करत नाही? ड्रग प्रकरणी काँग्रेसने नाशिकमध्ये आंदोलन करुन महाराष्ट्रातून ड्रग्जचा धंदा करणाऱ्यांची पाळेमुळे नष्ट करा, अशी मागणी केली होती. ललित पाटील या प्रकरणातील प्यादे आहे, खरे मास्टरमाईंड कोण आहेत हे समोर येण्यासाठी सरकारने चौकशी करावी, असेही नाना पटोले म्हणाले.

जागा वाटपाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीत अजून चर्चा झालेली नाही. मविआमध्ये कसलाही वाद नाही. मात्र महायुतीतच जागा वाटपावरून वादावादी सुरु झाली आहे. एकनाथ शिंदे यांचा गट लोकसभेच्या 17-18 जागा मागत आहे, ते आधी पहा. सध्या पाच राज्यातील विधानसभेवर काँग्रेस पक्षाने लक्ष केंद्रित केले आहे, योग्यवेळी महाविकास आघाडी जागा वाटपावर चर्चा करेल, असेही पटोले म्हणाले.