महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाबाबत अद्याप कोणताही निर्णय नाही – नाना पटोले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकसभा निवडणूक एका वर्षावर आली आहे. देशभरातले जवळपास सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. युत्या-आघाड्यांमध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरू झल्या आहेत. सत्ताधारी भाजपविरोधात विरोधी पक्ष एकजूट तयार करत आहेत. राज्यातही शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने महाविकास आघाडीच्या एकजुटीने भाजपसमोर आव्हान उभे आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाल्याची चर्चा आहे.

नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला यश मिळाले आहे. त्यामुळे काँग्रेससह मित्रपक्षांचा आत्मविश्वास वाढला आहे. राज्यातही महाविकास आघाडीच्या सातत्याने बैठका होत आहेत. आगामी रणनीती, महाविकास आघाडीच्या सभा आणि जागावाटपाबाबत यामध्ये चर्चा होत असल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक नुकतीच झाली. या बैठकीत जागावाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

महाविकास आघाडीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत तिन्ही पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येकी 16 जागा लढवाव्यात असा निर्णय झाल्याची चर्चा आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 16, राष्ट्रवादी 16 आणि काँग्रेस 16 जागा लढवेल अशी चर्चा आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पटोले यांना महाविकास आघाडीच्या जागाबाबत प्रश्न विचारण्यात आला. याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही. प्राथमिक चर्चा झाली आहे. जागावाटपाचा मुद्दा अजून पुढे गेलेला नाही, असे त्यांनी सांगितले.