Lok sabja 2019: अशोक चव्हाण आणि प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यात रंगतदार लढत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 विजय जोशी । नांदेड

सबंध राज्याचे लक्ष लागून असलेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण आणि त्यांचे कट्टर स्पर्धक शिवसेना-भाजपा युतीचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यातील लढत यावेळी रंगतदार ठरणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रा.यशपाल भिंगे, समाजवादी-बहुजन समाज पार्टीचे उमेदवार तथा माजी उपमहापौर अब्दुल समद यांच्या उमेदवारीने या निवडणुकीत आणखीनच चुरस निर्माण झाली आहे. मत काटाकाटीच्या राजकारणात युतीचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे पारडे जड दिसत आहे.

नांदेड लोकसभा मतदारसंघात १९८९ पासून दर पंधरा वर्षांनी चमत्कार घडत आला आहे. १९८९ साली व्यंकटेश काब्दे यांनी अशोकराव चव्हाण यांचा, २००४ साली युतीचे डी.बी.पाटील यांनी भास्करराव खतगावकर यांचा पराभव केला होता. आता बरोबर पंधरा वर्षानंतर २०१९ ची निवडणूक आली असून, दोन दिग्गजांच्या या लढतीत पुन्हा एकदा नांदेडचे मतदार चमत्कार घडवतील, अशी चिन्हे आहेत.

नांदेड लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीपासून प्रदेशाध्यक्ष असलेल्या अशोकराव चव्हाण यांना सुरुवातीच्या काळातच शुक्लाष्टके लागली. पक्षात माझे कुणी ऐकत नाही, अशी व्यथाच मनमोकळेपणे त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमोर बोलून दाखवली. त्यातच राधाकृष्ण विखे पाटील यांच्या चिरंजीवाने भाजपामध्ये प्रवेश केला. तर विखे पाटलांनी राष्ट्रवादीचा प्रचार करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली. यामुळे काँग्रेसच्या गोटामध्ये सध्या कमालीची अस्वस्थता आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारासाठी नांदेड शहरातील बहुजन सरसावले आहेत. हे वंचित बहुजन आघाडी समर्थक इतके आक्रमक बनले आहेत की, शहरातील काँग्रेसच्या नगरसेवकांना आपल्या उमेदवारासाठी प्रचारसभा आपल्या वार्डात घेणे अशक्य झाले आहे. मध्यंतरी काँग्रेसचे माजी आमदार चंद्रकांत हंडोरे यांची सभा महापौरांच्या वार्डामध्ये घेण्याचे ठरले होते. परंतु तेथील मतदारांनी आक्रमक भूमिका घेवून ही सभा होऊ दिली नाही. त्यावर उपाय म्हणून महापौरांनी ही सभा आपल्या घराच्या गच्चीवर घेतली. वंचित बहुजन आघाडीची वाढती लोकप्रियता काँग्रेसच्या मुळावर येणार आहे, हे सूर्य प्रकाशाएवढे स्पष्ट आहे.

इ.स.२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत अशोकराव चव्हाण यांना ४ लाख ९३ हजार ७५ मते मिळाली होती. त्यांचे नजिकचे प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्षाचे डी.बी. पाटील यांना ४ लाख ११ हजार ६२० मते मिळाली होती. म्हणजे अशोकरावांना ७१ हजार ४५५ मतांची आघाडी मिळाली होती. आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. त्यावेळी असे म्हणतात की, डी.बी.पाटील यांनी मनापासून प्रचार केला नव्हता. निवडणुकीच्या शेवटच्या काही दिवसात तर ते प्रचारासाठी बाहेरच पडले नाही. त्यामुळे अशोकरावांना ७१ हजार मतांची आघाडी मिळाली.

यावेळी परिस्थिती बरीच बदलली आहे. २०१४ मध्ये बहुजनांची मते एकगठ्ठा काँग्रेसला मिळाली होती. यावेळी बाळासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या वंचित बहुजन आघाडीस मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता बहुजनांची आणि विशेषतः दलितांची मते काँग्रेसकडे जाण्याची शक्यता फार कमी आहे. याशिवाय समाजवादी पार्टी-बहुजन समाज पक्ष आघाडीचे अब्दुल समद अब्दुल करीम यांचाही मुस्लिम मतदानामध्ये चांगला बोलबाला आहे. समद यांच्या मनमिळावू आणि कुणालाही मदत करण्याच्या स्वभावामुळे ते मुस्लिम समाजात चांगले व्यक्तीमत्व म्हणून परिचित आहेत. हा समाज समद यांच्या पाठिशी आहे. त्यामुळे काँग्रेसची वोट बँक असलेली मुस्लिम मते बऱ्यापैकी फुटण्याची शक्यता आहे.

बहुजन समाजाच्या मतांची फाटाफुट हे काँग्रेसच्या संभाव्य पराभवाचे एकमेव कारण नाही. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या झंझावाती प्रचाराला ग्रामीण भागातून मिळत असलेला उत्स्फूर्त पाठिंबा हे देखील या संभाव्य पराभावाचे कारण आहे. याउलट अशोकराव चव्हाण यांच्या प्रचारात आत्मविश्वास जाणवत नाही. पत्रकार परिषदांमध्येही अशोकरावांची देहबोली पूर्वीसारखी आत्मविश्वासाची नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या काही नगण्य माणसांना काँग्रेसमध्ये आणून त्याचा गवगवा काँग्रेसच्या वतीने करण्यात येत असला तरी काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षामध्ये ज्या संख्येने लोक येत आहेत. त्यामानाने काँग्रेसमध्ये येणाऱ्यांची संख्या नगण्य आहे.

जिल्ह्यातील शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा आदेश शिरसावंद्य मानून नांदेड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यामागे आपली शक्ती समर्थपणे उभी करुन त्यांना प्रचंड मताधिक्क्याने विजयी करण्याचा केलेला निर्धार आणि नांदेड जिल्हा लोकसभा मतदारसंघात महायुतीचा होत असलेला धडाकेबाज प्रचार यामुळे नांदेड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांचा विजय निश्चित झाला आहे.

धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होवू नये या हेतूने जनता दल (धर्मनिरपेक्ष) या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शरद पाटील आणि नांदेड शहराध्यक्ष सूर्यकांत वाणी तसेच डॉ.पी.डी.जोशी पाटोदेकर यांनी एका पत्रकार परिषदेत आपण काँग्रेसचे उमेदवार अशोकराव चव्हाण यांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. जनता दलाच्या या तीन नेत्यांमागे तीन माणसेही आहेत की नाहीत, अशी शंका आहे. अशा माणसांनी काँग्रेसला दिलेला पाठिंबा मतदार कितपत गंभीरपणे घेतील याची शंका नाही. हे सर्व लक्षात घेता नांदेडच्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्याचे बुरुज हळूहळू ढासळून मतमोजणीत २३ मेला हा किल्ला उदध्वस्त झाल्याचे दिसून येईल असे मतदाात बोलले जाते. येत्या १८ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानाकडे सबंध राज्याचे लक्ष लागून आहे.