नांदेड – गोदावरी नदीपात्रात पुन्हा मृत माशांचा खच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नांदेडमधील गोदावरी नदीच्या पात्रात गोवर्धन घाट ते नगिनाघाट मार्गावर हजारो मृत माशांचा खच पडला आहे. ते कशामुळे मृत्यूमुखी पडले याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. याआधी देखील दोन वर्षांपूर्वी जून 2020 मध्ये गोदावरी नदीच्या पात्रात तिनशे क्विंटल मृत माश्यांचा खच पडला होता. पर्यावरण विभागाने व प्रदूषण नियंत्रण मंडळाने याची माहितीही घेतली. प्राथमिकरित्या ऑक्सीजन न मिळाल्याने व ड्रेनेजचे पाणी गोदावरी नदीत सोडल्याने हा मृत्यू झाल्याचे म्हंटले होते. मात्र यास कुणाला दोषी ठरवायचे याचा अहवाल अद्यापही गुलदस्त्यात आहे.

दोन वर्षानंतर पुन्हा एकदा शुक्रवारी मध्यरात्रीपासून ते शनिवारी पहाटेपर्यंत हजारो माश्यांचा खच गोवर्धनघाट, नगिनाघाट, शनी मंदिर या गोदापात्राच्या परिसरात पडला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहराच्या विविध भागातून 18 ड्रेनेजच्या पाईपलाईनव्दारे ड्रेनेजचे पाणी गोदावरीत येते. गोदावरी जलशुध्दीकरणावर गेल्या पाच वर्षात जवळपास 15 कोटींचा निधी खर्च झाला. मात्र तो नेमका कशासाठी खर्च झाला ते गुलदस्त्यात आहे. केवळ कागदोपत्री हा खर्च झाला का? अशी चर्चा सध्या होत आहे. सकाळी याच घाटावर फिरण्यासाठी आलेल्या अनेक पादचार्‍यांना दुर्गंधीचा सामना करावा लागला. त्यातील काही जणांनी मनपाशी संपर्क साधल्यानंतर महापालिकेची यंत्रणा त्याठिकाणी तैनात करुन गोदापात्रात तरंगत असलेले हजारो मासे बाहेर काढण्यात आले. त्याची आता विल्हेवाट लावली जात आहे. हे असे प्रकार का होत आहेत याचे उत्तर मनपालाही देता आले नाही. या प्रकरणाची चौकशी करु, असे उत्तर मनपा प्रशासनाने दिले.

दरम्यान नांदेडच्या सायन्स कॉलेजच्या मत्स्य विभागाचे प्रमुख डॉ.किरण शिल्लेवार यांनी आपल्या काही सहकार्‍यांसह आज सकाळीच तेथे भेट दिली. ”घडलेला प्रकार हा भयानक असून, कदाचित ऑक्सीजन कमी झाल्यामुळे किंवा विषबाधेमुळे हा प्रकार घडला असावा, याची चौकशी आता मनपाने केली पाहिजे. नदीच्या परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून, प्रदूषण नियंत्रण मंडळ व मनपा केवळ नामधारी आहे काय, असा सवालही डॉ.शिल्लेवार यांनी केला.