नांदेड जिल्ह्यातील नेरली येथील पाणीपुरवठा करणार्या पाण्याच्या टाकीतून दुषित पाणी पुरवठा झाल्याने शेकडो जण बाधीत झाले. उलट्या, जुलाब, चक्कर, मळमळ व अस्वस्थ वाटू लागल्याने यापैकी काही जणांना प्राथमिक उपचार करुन सोडून देण्यात आले. तर काहींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर नांदेडच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नांदेड जिल्ह्यात तीन महिन्यांपूर्वी भगरीच्या माध्यमातून विषबाधा झाल्याचा प्रकार घडला होता. तरीही प्रशासन याबाबत गंभीर दिसून येत नाही. काल रात्री नेरली येथे पाणीपुरवठ्याच्या टाकीतून दुषित पाणी पुरवठा झाल्याने अनेकांना बाधा झाली. अनेकांना संडास, उलट्या, मळमळ व अस्वस्थ वाटू लागल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातवरण निर्माण झाले होते. गावातील दोनशे जणांना बाधा झाल्याचे दिसून आले. या सर्वांची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असली, तरी अनेक रुग्णांवर नांदेडच्या रुग्णालयात अद्यापही उपचार सुरू आहेत. या संपूर्ण प्रकारानंतर गावात आरोग्य पथक दाखल झाले असून रुग्णांची तपासणी करुन उपचार दिले जात आहेत.
नेरली गावातील सार्वजानिक टाकीतील पाणी दुषित झाल्याने हा प्रकार घडल्याचे डॉक्टरांनी माध्यमांना सांगितले आहे. आरोग्य विभागाने पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले असून, सध्या टाकीतून पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. टाकीची सापसफाई करण्यात येणार आहे. या गावात शासनाने पाच वर्षांपूर्वीच वॉटर फिल्टर योजना दिली असल्याची माहिती मिळाली. पण पाच वर्षापासून हे वॉटर फिल्टर धुळखात पडून आहे. 2022 साली जलजीवन मिशनची योजना मंजूर झाली, मात्र योजनेचा बोर्ड नुकताच गावात बसवण्यात आला असून गावात त्याचे कामच झाले नसल्याचे उपसरपंचांनी सांगितले.
दरम्यान, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी याची तातडीने दखल घेत आरोग्य विभागाला सूचना दिल्या. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य पथकाने 256 रुग्णांची तपासणी केली. त्यांच्यापैकी 99 रुग्णांना प्रकृती अस्वस्थ वाटू लागल्याने शासकीय रुग्णालयात व अन्य रुग्णांना खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार नांदेडच्या शासकीय रुग्णालयात तसेच नवोदय क्रिटीकल केअर सेंटर, डॉ. बरडे हॉस्पिटल, हेल्थ पल्स हॉस्पिटल व विष्णूपुरी येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.