अमेरिकेत जपानची टेनिस क्रांती, नाओमी, निशिकोरी उपांत्य फेरीत

28

सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क

महिला गटात नाओमी ओसाका आणि पुरुष गटात केई निशिकोरी या जपानी खेळाडूंनी अमेरिका ओपन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक देऊन इतिहास घडविला. ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेच्या इतिहासात एकाच वेळी महिला आणि पुरुष गटात उपांत्य फेरी गाठण्याची जपानची ही पहिलीच वेळ होय. त्यामुळे अमेरिकेत जपानची ही टेनिस क्रांतीच म्हणावी लागेल. नाओमी ही तर 22 वर्षांनंतर ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारी पहिली जपानी महिला टेनिसपटू ठरलीय. आता उपांत्य फेरीत नाओमीची गाठ अमेरिकेच्या मेडिसन कीज हिच्याशी पडेल, तर निशिकोरीपुढे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे कडवे आव्हान असेल.  

नाओमीने 22 वर्षांनंतर प्रतीक्षा संपविली

नाओमी ओसाकी हिने उपांत्यपूर्व लढतीत युक्रेनच्या लेसिया सुरेंको हिचा 6-1, 6-1 असा सरळ सेटमध्ये धुव्वा उडविला. याचबरोबर तब्बल 22 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जपानची महिला टेनिसपटू ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत उपांत्य फेरी गाठण्यात यशस्वी ठरली.

केई निशिकोरीने पाच सेटपर्यंत रंगलेल्या उपांत्यपूर्व लढतीत सातव्या मानांकित बोस्नियाच्या मारिन सिलीच याचा 2-6, 6-4, 7-6(7/5), 4-6, 6-4 असा पराभव करून तिसऱयांदा अमेरिका ओपनच्या अंतिम चारमध्ये स्थान मिळविले.

आपली प्रतिक्रिया द्या