नरेंद्र मोदी हे फेल झालेले इंजिन!

नरेंद्र मोदी यांनी मागील दहा वर्षांत देशाला अधोगतीकडे नेले आहे. मोदींनी जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. सर्व पक्षातील भ्रष्टाचारी नेत्यांना भाजपमध्ये घेणारे मोदी हे भ्रष्टाचाऱयांचे सरदार आहेत. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी सर्व समाज घटकांच्या समस्या, वेदना, दुःख जाणून घेतले व त्यांना प्रचंड जनसमर्थनही लाभले आहे. नरेंद्र मोदी हे फेल झालेले इंजिन असून राहुल गांधींचे इंजिनच देशाला प्रगतिपथावर घेऊन जाईल, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत भरला. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. आमदार प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी जाहीर सभा पार पडली व त्यानंतर भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी माकप नेते नरसय्या आडम, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, उज्ज्वला शिंदे यांच्यासह सर्वपक्षीय नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

भाजपने दहा वर्षांत काय केले? – प्रणिती शिंदे

गेल्या दहा वर्षांत सोलापुरात भाजपने काहीच केले नाही, पण भाजप त्या मुद्दय़ावर बोलत नाही. शेतकऱयांच्या मालाला भाव नाही, सोलापुरात पाणी नाही. मात्र भाजपला या समस्यांऐवजी दुसरेच मुद्दे उपस्थित करत आहे. भाजपने गेल्या दोन वर्षांत उजनीच्या पाण्याचा प्रश्न का सोडवला नाही? जनतेत भाजपविरोधात रोष आहे, अशी टीका सोलापूर प्रणिती शिंदे यांनी केली.

भाजपचे दोन माजी खासदार का गायब होते?

ज्या शेतकऱयांच्या जिवावर आपण जगतो त्यांचा जीव भाजप घेत आहे. सोलापूरच्या जनतेने दहा वर्षे विश्वासाने तुम्हाला निवडून दिले, पण तुम्ही विश्वासघात केला. सातपुतेंचा अर्ज भरताना दोन्ही माजी खासदार तुमच्यासोबत का आले नाहीत? ते कुठे गायब झाले होते? त्यांना तुमच्याबरोबर येण्याची लाज वाटते का, असा सवालही प्रणिती शिंदे यांनी यावेळी केला.

भगीरथ भालके यांचा पाठिंबा 

धैर्यशील मोहिते-पाटलांसह विजयसिंह मोहिते-पाटील पुन्हा शरद पवारांसोबत गेल्याने सोलापूर जिह्यातील समीकरण बदलले आहे. मोहिते-पाटलांनी धक्का दिल्याने भाजपचे सोलापूरचे उमेदवार राम सातपुते यांना निवडणूक जड जाणार आहे. त्यात आता आणखी एका नेत्याने प्रणिती शिंदेंना पाठिंबा जाहीर केला आहे. पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यात ताकद असलेल्या भगीरथ भालके यांनी सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीत त्यांना पाठिंबा जाहीर केला. पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले भगीरथ भालके सध्या के. सी. राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षामध्ये आहेत.