मोदींचा सूर बदलला; 35 मिनिटांच्या भाषणात 10 वेळा एनडीएचा जप

गेली दहा वर्षे मोदी सरकार…मोदी सरकार… असा डांगोरा पिटणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजच्या निकालानंतर सुर बदलला आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेले यश हे जनतेने एनडीएवर व्यक्त केलेला विश्वास आहे. आजचा विजय हा जगातल्या सगळ्यात मोठय़ा लोकशाहीचा विजय असून एनडीए देशात तिसऱयांदा सरकार स्थापन करेल, असे सांगतानाच पंतप्रधान मोदी यांनी चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा आवर्जुन उल्लेख आपल्या भाषणात केला. मोदी यांनी रात्री उशीरा भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांच्या ओठावर भाजप कमी आणि एनडीएचे नाव अधिक होते. जवळपास 35 मिनीटांच्या भाषणात 10 वेळा एनडीएचा उल्लेख केला. सबका साथ, सबका विकास हा विजयाचा मंत्र घेऊन पुढे जाऊया, असे ते म्हणाले.

अयोध्येत भाजपचा पराभव
प्रभू श्रीराम मंदिर ज्या मतदारसंघात आहे त्या फैजाबाद लोकसभा मतदारसंघातील जनतेनेच भाजपला नाकारले आहे. सपाचे अवधेश प्रसाद यांनी भाजपचे लल्लू सिंह यांचा 55 हजारांवर मतांनी पराभव केला. अयोध्येतच पराभव झाल्यामुळे भाजप नेते हादरले आहेत.

दिग्गजांना धक्का
मागच्या निवडणुकीत अमेठीतून कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांना पराभूत करून जायंट किलर ठरलेल्या पेंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना यावेळी जनतेने नाकारले. कॉँग्रेसच्या किशोरीलाल शर्मा यांनी त्यांना पराभूत केले. सुलतानपूरमध्ये भाजप नेत्या मनेका गांधींचा  सपाचे रामधुअल निशाद यांनी पराभव केला. गेल्या 20 वर्षांपासून जालन्याचे खासदार असलेले भाजप नेते आणि पेंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना कॉँग्रेसच्या कल्याण काळे यांनी पराभूत केले. पेंद्रीय मंत्री असलेले भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार कपिल पाटील यांचा राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या बाळय़ामामा म्हात्रे यांनी पराभव केला. राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना कॉँग्रेसच्या  प्रतिभा धनोरकर यांनी पराभवाची धूळ चारली. तर दिंडोरीत भाजप उमेदवार पेंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांचा राष्ट्रवादीचे भास्कर भगरे यांनी पराभव केला.