पंतप्रधान, मुख्यमंत्री म्हणून खूप काम केले… आता राष्ट्रनीतीसाठी काम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान आणि मुख्यमंत्री म्हणून मी खूप काही केले, परंतु आता मी ‘राजकारणा’साठी नाही तर ‘राष्ट्रनीती’साठी काम करतोय, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना आपण आदर्श मानतो… त्यांच्यापासून प्रेरणा घेऊनच काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले. महाघोटाळे, दहशतवादी हल्ल्यांपासून देशाची सुटका केल्याचे ते म्हणाले. आज रविवारी नवी दिल्लीत आयोजित राष्ट्रीय अधिवेशनात पुढच्या हजार वर्षांसाठी रामराज्याचा ठराव मंजूर करण्यात आला. तसेच 2047पर्यंत भारत विकसित राष्ट्र म्हणून उदयाला आणण्याचा संकल्पही करण्यात आला.

सभामंडपामध्ये 65 मिनिटांच्या भाषणात मोदींनी केवळ मोदी आणि मोदीच केले. सर्व देशांनाही विश्वास आहे की, आयेगा तो मोदीही. विविध देशांनी पुढचे पंतप्रधान म्हणून जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये भेटीची आमंत्रणे आतापासूनच दिली आहेत, असेही मोदी म्हणाले. भाजपाच्या विचारधारेचा सामना करण्याचे धैर्य काँग्रेसमध्ये नाही, अशा शब्दांत मोदींनी विरोधकांवर टीकाही केली.

मोदींना निवडणुकांची भीती वाटते – काँग्रेस
मोदींना निवडणुकांची प्रचंड भीती वाटते. त्यामुळेच भाजप काँग्रेसमधून ज्येष्ठ नेत्यांना आपल्या पक्षात आयात करत आहे, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तारीक अन्वर यांनी केला आहे. भाजपाच्या फोडाफोडीच्या राजकारणावरून अन्वर यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.