
कार्यकाळ संपल्यामुळे बंद पडलेला नासाचा कृत्रिम उपग्रह बुधवार, 19 एप्रिलला सकाळी 7 नंतर दिवसभरात पृथ्वीवर पडणार आहे. नासाने हा उपग्रह 21 वर्षांपूर्वी अवकाशात सोडला होता. त्याचे नाव ‘आरएचईएसएसआय स्पेसक्राफ्ट’ असे आहे. दरम्यान, या उपग्रहाच्या पडण्याची अचूक वेळ आणि मार्ग माहीत नसल्यामुळे संशोधकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. नासाचा 273 किलो वजनाचा उपग्रह समुद्रात पडला तर कोणाला काही इजा होणार नाही, मात्र निवासी भागात पडला तर मोठी दुर्घटना होऊ शकते, अशी भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.























































