
इंधनाच्या दरात चौथ्यांदा झालेली वाढ आणि सोने-चांदीच्या आयात शुल्कात केंद्र सरकारने केलेल्या वाढीचा जोरदार झटका सर्वसामान्यांना बसणार आहे. जूनमध्ये किरकोळ महागाईचा दर पाच टक्क्यांवर जाण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. महागाईचा दर वाढल्यास नाईलाजाने आरबीआयला व्याजदरात वाढ करावी लागेल, यामुळे कर्जदारांना जास्तीचा ईएमआय भरावा लागेल, असा अंदाज अर्थतज्ञांनी वर्तवला आहे.
अवघ्या 11 दिवसांत पेट्रोलच्या दरात लिटरमागे 7.38 रुपये, तर डिझेलच्या दरात 7.48 रुपये वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलियम उत्पादनांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे किरकोळ महागाईत पाऊण टक्का वाढ होईल. मे महिन्यात किरकोळ महागाईचा दर 4 ते 4.5 टक्के राहील, तर जून महिन्यात हाच दर 4.5 ते 5 टक्क्यांवर जाईल. मे महिन्यातील किरकोळ महागाईची आकडेवारी 12 जूनला जाहीर होणे अपेक्षित आहे. किरकोळ महागाईचा दर 5 टक्क्यांच्या पुढे गेल्यास रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर वाढ सुरू होईल, असा अंदाज ‘ईवाय इंडिया’चे मुख्य धोरण सल्लागार डी. के. श्रीवास्तव यांनी व्यक्त केला आहे.


























































