
>> वैद्य सत्यव्रत नानल
चेहऱयाची त्वचा कोरडी पडणे – रात्री झोपताना एरंडेल तेल चेहऱयाला हळुवारपणे जिरवावे. तेलाचा वास आवडत नसेल तर त्यात गुलाब, मोगरा वगैरे इसेंशियल ऑईलचे काही थेंब मिसळावेत. तेल लावण्यापूर्वी कोमट पाण्याने चेहरा धुवावा किंवा चेहऱयावर थोडा वेळ वाफ घ्यावी. हे सलग आठ दिवस केल्यावर फरक दिसू लागतो. सलग दोन महिने केल्याने उत्तम परिणाम दिसतो.
एरंडेलाचे मलमही आपण घरीच बनवू शकतो. 20 मिली कोमट तेलात 5 मिली मेण मिसळावे आणि मोठय़ा तोंडाच्या बाटलीत भरून ठेवावे. सुगंधही मिसळावा. थंड झाल्यावर मलम तयार होते. जरुरीप्रमाणे थोडे थोडे बनवावे.
सर्वांगावरील त्वचा कोरडी पडणे – आयुर्वेदानुसार 365 दिवस सर्वांगास मालिश करणे उत्तम असे सांगितले आहे. आजच्या जोरात धावणाऱया काळात आणि आळशीपणामुळे हे करणे लोक टाळतात. आपल्या शरीरात तेल जिरवावे आणि गरम पाण्याने आंघोळ करावी. सलग 21 दिवस केल्याने अपेक्षित फायदा सगळ्यांना मिळतो आणि दिसतोही.
हातापायाचे तळवे (भेगा, जखमा होणे इत्यादी त्रास) – थंडीमुळे हातापायांना पडलेल्या भेगा असतील, त्यातून रक्त येत असेल, जळजळ होत असेल, वेदना अधिक असेल तर वर सांगितलेले एरंडेल तेल मलम भेगांमध्ये भरावे. एरंडेल, डालडा, डुकराची वितळवलेली चरबी यांपैकी अनेक पदार्थ मलम बनवण्यासाठी वापरता येतात आणि स्वस्तात उपलब्धही होतात. मलम बनवून ते रात्री झोपताना भेगांमध्ये भरून त्यावर प्लॅस्टिकची पिशवी बांधून ठेवावी. सकाळी काढावी.
मलम रात्री लावण्यापूर्वी तळवे 15 ते 20 मिनिटे गरम पाण्यात भिजवून ठेवावे. अधिक फायदा होतो.
थंडीत बद्धकोष्ठाचा त्रास वाढला आणि शौचाची जागा कोरडी पडून त्रास देत असेल तर एरंडेल तेल मलम शौचाच्या जागेत सपोझिटरीसारखे बसवावे.
डोक्यात कोंडा, पुरळ, कोरडेपणा – डोक्याला तेल लावल्याने हजारो फायदे होतात. त्यात हे छोटे मोठे सर्व त्रासही कव्हर होतात. सोबत त्रिफळा, शिकेकाई, रिठा घेऊन त्यात लिंबू रस साधून त्याने केस धुवावेत. आठवडय़ातून दोन ते तीनवेळा करावे.
डोळे, कान, नाक कोरडे पडणे -डोळे कोरडे पडणे यासाठी रात्री झोपण्यापूर्वी सोमवार ते शुक्रवार तुपाचे दोन-दोन थेंब आणि शनिवार, रविवार एरंडेल एक-एक थेंब सोडून झोपावे. कानात कोरडेपणा असेल तर बिल्व तेल कानात एक-एक थेंब बोटाने जिरवावे. नाकात कोरडेपणा असेल तर रोज आंघोळीपूर्वी नाकात एक-एक थेंब घालावे.
थंडीत कोरडेपणा कमी रहावा म्हणून आहारात झोपताना कोमट दूध किंवा कोमट पाण्यात चार चमचे तूप घालून प्यावे किंवा ताजे लोणी असेल तर एक चमचा लोणी आणि एक कप कोमट दूध एकत्र करून प्यावे.
दूध, तूप, तेल, ताजे लोणी आहारात नियमित असेल तर कोरडेपणा त्रास देत नाही, नियमित व्यायाम आणि हे अन्नपदार्थ नियमित असतील तर आरोग्य उत्तम राहते आणि दीर्घायुष्य मिळते असे आयुर्वेद म्हणतो.


























































