माथाडी कामगार चळवळीत उभी फूट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। नवी मुंबई

असंघटित क्षेत्रातील कामगारांना संघटित करण्यासाठी अण्णासाहेब पाटील यांनी स्थापन केलेल्या माथाडी कामगार चळवळीत आता फूट पडली आहे. माथाडी नेते नरेंद्र पाटील, आमदार शशिकांत शिंदे आणि गुलाबराव जगताप यांच्यात आरोप-प्रत्यारोंपांचा कलगीतुरा रंगला आहे आहे. कळंबोली येथे सोमवारी झालेल्या एका कार्यक्रमात शशिकांत शिंदे यांनी सरकारने माथाडी चळवळ मोडीत काढण्याचा घाट घातला असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांवर केला तर सरकारला लक्ष्य करणाऱया माथाडी नेत्यांना नरेंद्र पाटील यांनी आज गद्दार ठरवले आहे. त्यामुळे माथाडी युनियनमधील वाद लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

माथाडी कामगारांच्या प्रश्नांकडे आघाडी सरकारने कधीच गांभीर्याने पाहिले नाही. त्यामुळे 2006 पासून अनेक प्रश्न प्रलंबित राहिले. ते सोडविण्यासाठी सत्तेत असून अनेक वेळा आम्ही आंदोलनेही छेडली, परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. मात्र युती सरकारने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माथाडी कामगारांचे जवळपास सर्वच प्रलंबित प्रश्न तडीस लावले आहेत. आमच्या काही नेत्यांना हे पचलेले नाही. त्यामुळे त्यांच्याकडून कुणाला तरी खूश करण्यासाठी असे बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. असे माथाडी नेते.नरेंद्र पाटील यांनी म्हटले आहे.

माथाडी कामगारांच्या प्रश्नांची जाणीव करून देणे ही टीका होत नाही. यापूर्वी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार असताना जाहीर कार्यक्रमातून ही जाणीव अनेक वेळा करून देण्यात आली आहे. कळंबोलीमध्ये झालेल्या कार्यक्रमातही माथाडी कामगारांच्या न सुटलेल्या प्रश्नांचे वास्तव मांडण्यात आले. कुणावरही आरोप करण्यात आलेले नाहीत. असे माथाडी नेते गुलाबराव जगताप यांनी म्हटले आहे.

कळंबोली येथे सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. याच मेळाव्यात आमदार शशिकांत शिंदे आणि माथाडी नेते गुलाबराव जगताप यांनी माथाडींच्या रखडलेल्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सरकारवर जोरदार टिका केली. सरकारच्या कामगारविरोधी धोरणामुळे माथाडी कामगार देशोधडीला लागला असल्याचा आरोपही यावेळी त्यांच्याकडून करण्यात आला. या आरोपांचा नरेंद्र पाटील यांनी आज माथाडी भवनमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जोरदार समाचार घेतला. युती सरकारमुळे माथाडी कामगारांच्या वडाळ्यातील घरांचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळे सोमवारी झालेले आरोप हे बिनबुडाचे आहेत, असे नरेंद्र पाटील यांनी स्पष्ट करून हे आरोप करणाऱया दोन्ही नेत्यांना अप्रत्यक्षपणे गद्दार ठरवले आहे. त्यामुळे माथाडी कामगारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.