
सर्वसामान्य प्रवाशांशी नेहमीच् हुज्जत घालून मीटरऐवजी मनमानी भाडे घेणाऱ्या रिक्षाचालकांच्य दादागिरीचा फटका आज चक्क आरटीओ अधिकाऱ्यांना बसला. नवी मुंबईत आरटीओ कार्यालयातील सहाय्यक वाहन निरीक्षक तुषार कदम यांच्यावर भाड्याच्या वादातून सुमारे दहा रिक्षाचालकांनी हल्ला केला-यात कदम यांना मुका कार लागला असून डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. हा प्रकार आज सकाळी नेरुळ येथील एलपी जंक्शनवर घडला असून या प्रकरणी नेरुळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तुषार कदम हे आज सकाळी सांगली येथून नवी मुंबईत येत होते. ते साडेपाचच्या सुमारास नेरुळ येथील एलपी जंक्शनवर बसमधून उतरले. त्यावेळी त्यांनी उलवे येथे जाण्यासाठी रिक्षा पकडली. मात्र रिक्षाचालकाने मीटरवर येण्यास नकार देऊन मनमानी भाडे सांगितले. मात्र ते भाडे देण्यास नकार देऊन रिक्षाचालकाला मीटरवर येण्याचा आग्रह केला. त्यावेळी या रिक्षाचालकाने आपले सुमारे दहा सहकारी बोलावले आणि कदम यांना बेदम मारहाण केली. या हल्ल्यात कदम यांना मुका मारा लागला असून त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली.
मग्रूर रिक्षाचालकांवर कारवाई करणार
रिक्षाचालकांनी मीटरप्रमाणे भाडे घ्यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतरही काही रिक्षाचालक अशा पद्धतीने दादागिरी करून प्रवाशांना वेठीस धरत असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही. या मग्रूर रिक्षाचालकांना धडा शिकवण्यासाठी लवकरच एक मोहीम सुरू करण्यात येणार आहे, अशी प्रतिक्रिया वाशीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दत्ता सांगोलकर यांनी दिली आहे.
- नवी मुंबई महापालिकेने शेकडो कोटी रुपये खर्चुन शहरात सीसीटीव्हीचे जाळे निर्माण केले आहे. मात्र एलपी जंक्शनवर लावण्यात आलेले सर्वच सीसीटीव्ही बंद असल्याचे आज उघडकीस आले.

























































