नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ; दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे म्हणत अकोल्यात तक्रार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्याविरुद्ध अकोल्यात पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामुळे नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

तक्रारीत नमूद करण्यात आल्यानुसार, अमरावती येथे खासदार नवनीत राणा यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी वाद घातला. यावेळी त्यांनी सतत ‘लव्ह जिहाद’ चा उल्लेख केला. हे प्रकरण एका बेपत्ता मुलीशी संबंधित होते. तरीही दोन धर्मांमध्ये शत्रुत्व निर्माण करण्याच्या उद्देशाने त्या मुलीला अन्य धर्माच्या मुलाने पळवून नेल्याचा त्यांचा आरोप करण्यात येत होता. सोशल मीडियावर हे व्हिडीओ व्हायरल झाले. नवनीत राणा यांनी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी शांतता भंग करणारी कृत्ये केल्याचे या तक्रारीत नमूद आहे.

‘खासदार राणा यांचं विधान हे दोन धर्म आणि समुदायांमध्ये वैर निर्माण करण्याच्या उद्देशाने करण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी’, अशी मागणी जावेद झकेरिया यांनी या तक्रारीत केली आहे.