
कार्डेलिया ड्रग्ज पार्टी, अंडरवर्ल्ड संबंधांच्या वादानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक व भाजप आमदार आशीष शेलार यांच्यात नव्याने आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत. आशीष शेलार व रजा अकादमीच्या नेत्यांच्या भेटीचा फोटो दाखवत शेलार तिथे काय करीत होते, असा सवाल नवाब मलिक यांनी केला त्यावर आम्ही फोटो दाखवले तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही, अशा शब्दांत आशीष शेलार यांनी पलटवार केला.
नवाब मलिक यांनी आशीष शेलार व रजा अकादमीच्या नेत्यांच्या भेटीचा फोटो दाखवला आणि शेलार हे रझा अकादमीच्या नेत्यांना का भेटले याचे स्पष्टीकरण देण्याची मागणी केली. त्यावर वेगवेगळय़ा प्रकारच्या फोटोंच्या जिवावर अफवांचे राजकारण करणे हा तुमचा धंदा आहे; पण त्रिपुराच्या घटनेनंतर राज्यात घडलेल्या दंगलींचा आणि 2016-17 या वर्षातील फोटोंचा संबंध काय, असा सवाल आशीष शेलार यांनी केला. दरम्यान, यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यासंदर्भात माझ्याकडे काही माहिती नाही असे स्पष्ट केले.
























































