
विरोधी पक्षनेते अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा एक गट बनवून भारतीय जनता पक्षामध्ये जाणार असून ते लवकरच मुख्यमंत्री बनतील अशा चर्चांना आज उधाण आले होते. भाजप नेतेही त्यासंबंधी उलटसुलट वक्तव्ये देऊन आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न करत होते. मात्र माध्यमांतून प्रसिद्ध होत असलेल्या बातम्या असत्य असल्याचे सांगत स्वतः अजित पवार यांनीच या चर्चांना पूर्णविराम दिला.
आज सकाळपासूनच टीव्हीवर अजित पवार यांच्याबद्दल बातम्या सुरू होत्या. सोशल मीडियावरही वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत होत्या. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असून ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने प्रसिद्ध केल्यानंतर या चर्चांना सुरुवात झाली.
अजित पवार यांनी पुण्यातील आपले सर्व पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करून मुंबईच्या दिशेने प्रयाण केल्याचे वृत्त टीव्हीवर झळकले तेव्हा चर्चा अधिकच रंगतदार बनली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजितदादा समर्थक आमदारही मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचे त्यापाठोपाठ सांगण्यात येऊ लागले. त्यानंतर पिंपरीचे आमदार अण्णा बनसोड यांच्या वक्तव्याने त्या बातम्या सर्वांना खऱ्या वाटू लागल्या. बनसोड यांनी तर आपण मुंबईमध्ये बैठकीसाठी जात असून गोड बातमीची वाट पाहत असल्याचे सांगितले.
…या चर्चा असत्य
अखेर अजित पवार यांनीच मौन सोडले. खारघर येथील ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यात मृत्यूमुखी पडलेल्या श्री सदस्यांच्या कुटुंबीयांना व उष्माघातामुळे बाधित झालेल्या श्री सदस्यांना भेट देऊन त्यांना धीर देण्यासाठी मी ‘एमजीएम’ हॉस्पिटलमध्ये सोमवारी पहाटेपर्यंत उपस्थित होतो. सोमवारी माझा कोणताही नियोजित कार्यक्रम नव्हता. मी मुंबईतच आहे. उद्या मंगळवारी मी विधान भवनातील माझ्या कार्यालयात उपस्थित राहणार असून कार्यालयाचे नियमित कामकाज सुरू राहणार आहे’, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. ‘मंगळवारी मी आमदारांची बैठक बोलावल्याच्या बातम्या काही माध्यमांतून प्रसिद्ध होत आहेत, त्या पूर्णतः असत्य आहेत. मी आमदार अथवा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली नाही’, असेही त्यांनी ट्विटरवर नमूद केले.































































