
सामना प्रतिनिधी, उरण
पनवेल शहरासह ग्रामीण भागाला पाण्याच्या झळा बसत असल्याने नागरिकांची उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना नाराजी सहन करावी लागत आहे. त्रयस्थ मतदार सरळसरळ दरवाजा बंद करून उमेदवार आणि त्यांच्या जत्रेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांचा पुणेरी शैलीत अवमान करताना दिसत आहेत. याचा फटका गेल्या तीन चार दिवस पनवेल तालुक्यात प्रचार करणाऱ्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला बसत आहे.
ग्रामीण भागाची लाईफ लाईन असलेल्या पंचायत समितीची एकहाती सत्ता आतापर्यंत शेकाप उपभोगत आहे. पण तालुक्यातील एकाही गावाला नळ पाणी योजना पोहचली नाही. एकीकडे वाढत्या उन्हाच्या झळा आणि दुसरीकडे ओढे, विहिरीतून पाणी आणताना सोसाव्या लागणाऱ्या कळा महिलांना मनस्ताप देत आहेत. सहन होत नाही आणि सांगता येत नाही अशी गावे, वाड्या, आदिवासी पाड्यातील पाण्याची स्थिती असल्याने महिला, पुरुष मतदार रोष व्यक्त करीत आहेत. त्यात दोन तीन दिवस राष्ट्रवादीचे मावळ मतदार संघाचे लोकसभा उमेदवार पार्थ पवार यांचा हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या कार्यकर्त्यांसह प्रचार दौरा सुरू आहे. त्यांना महिलांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
पाणी नाही तर मतदान नाही. इतकी वर्षे झाली साधे पाणी देता येत नसेल तर मतदानही करणार नाही, असे महिला मतदार पाटील सुनावत आहेत. कुठल्याही पक्षाचा उमेदवार असला तरी दरवेळी पाणी देतो, अशी मखलाशी करतात आणि निवडणूक झाली की कुणी इकडे फिरकत नाही, असे सांगत रागाने घराचा दरवाजा लावून घेण्याचे प्रकारही घडू लागले आहेत. ग्रामीण भाग पाण्याने तडफडत आहे. आता आमच्याकडून जास्त अपेक्षा ठेवू नका. श्रीमंतीचा डामडौलही दाखवून फसवणूक करू नका आणि मतं मागू नका, असे राष्ट्रवादी उमेदवार आणि कार्यकर्त्यांच्या तोंडावर एऐकविल्याने पनवेलचा रंग भलताच गडद होत आहे. हे ऐकून राष्ट्रवादीच्या उमेदवारासह प्रचारकही घायाळ होऊ लागले आहेत.




























































