फडणवीसांनी केलेल्या टीकेवर अजित पवार म्हणाले…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ajit-pawar

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्र विकास आघाडीच्या गुरुवारी 7 नेत्यांनी शपथ घेतली. यासोबतच विरोधकांनी ‘महाराष्ट्र विकास आघाडी’च्या कॉमन मिनिमन प्रोग्राम म्हणजे किमान समान कार्यक्रमावर टीका केली होती. त्यासंदर्भात वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना प्रश्न विचारले असता त्यांनी आपली भूमिका अगदी स्पष्ट शब्दात मांडली.

अजित पवार यांनी पत्रकाराने विचारेल्या प्रश्नावर बोलताना स्पष्ट केले की, ‘एकतर महाराष्ट्राच्या करिता किमान समान कार्यक्रम दिलेला आहे. त्या निमित्ताने ते कुठल्या कुठल्या कार्यक्रमांना प्राधान्य देणार ते कळालेलं आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा संपूर्ण राज्याचा असतो. कोणत्या एका ‘रिजन’साठी नसतो. फक्त एका कुठल्या रिजनसाठी त्याला काही करता येत नाही. कुणीही मुख्यमंत्री असला तरी त्यांना हेच पहावं लागतं’, असं अजित पवार म्हणाले. टीकेचा संदर्भ घेत ते म्हणाले की, ‘आता यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय बोलावं तो त्यांच्या प्रश्न आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याला उत्तर देखील दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीनंतर त्यांना शुभेच्छा देणारं ट्वीट केलं. त्यानंतर लगेचच ‘महाराष्ट्र विकास आघाडी’च्या किमान समान कार्यक्रमावर टीका केली होती. ‘या कार्यक्रमात वारेमाप घोषणा असल्या तरी मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या विकासाच्या वाटचालीत वर्षानुवर्षे मागे राहिलेल्या क्षेत्राचा साधा नामोल्लेख सुद्धा असू नये, हे दुर्दैवी आहे.’ असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं.

‘विरोधकांना राज्याची आर्थिक परिस्थिती माहीत नसते सरकारला माहीत असते. कुठलाही निर्णय घेत असताना तेवढा निधी संबंधित बँकांना द्यावा लागतो. सीएफ अॅडव्हान्स काढावा लागतो. अधिवेशनाच्या काळात त्याला सभागृहाची परवानगी लागते. प्रक्रिया असतात’, असं सांगत त्यांनी मुख्यमंत्र्याच्या बाजूनं आपलं मत व्यक्त केलं.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात विचारले असता, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेटची बैठक घेतली. तीनही पक्षाचे मंत्री त्यावेळी उपस्थित होते. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. गुरुवारच्या कॅबिनेटनध्ये स्वत: मुख्यमंत्री म्हटले आहेत मला थोडासा वेळ द्या, त्यांनी तशा सूचना सचिवांना दिल्या आहे. तेव्हा त्यांनाही काही वेळ द्यावा लागेल. अजून शपथ घेऊन 24 तास देखील झालेले नाही’, असेही ते म्हणाले.