
कर्नाटकातील जनतेने धर्मनिरपेक्ष शक्तींना निवडले असून येत्या काही महिन्यात इतर राज्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये हाच कल कायम राहील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
विधानसभा निवडणुकीत जवळपास 50 टक्के जागा भाजपने गमावल्या आहेत. कर्नाटकच्या जनतेने भाजपला नाकारले आहे. पंतप्रधानांनी मोठ्या प्रमाणावर प्रचार केला असतानाही भाजपचा दारुण पराभव होतो याचा अर्थ पंतप्रधानांची प्रतिमा घसरली आहे हे स्पष्ट होते, असा हल्लाबोलही तपासे यांनी केला.
कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातील जनताही भ्रष्टाचाराला कंटाळली आहे. आता शिंदे – फडणवीस सरकारचा पर्दाफाश करण्यासाठी आम्ही व्यापक प्रचार मोहीम राबवणार आहोत. रविवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक शरद पवार यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीमध्ये महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणाशी संबंधित अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात काय म्हटले आहे आणि महाविकास आघाडीला घालवण्यासाठी राज्यपालांच्या कार्यालयाचा दुरुपयोग कसा झाला हे आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना समजावून सांगणार आहोत, असेही ते म्हणाले.
वाढत्या उष्णतेमुळे महाविकास आघाडीची ‘वज्रमुठ’ सभा पुढे ढकलण्यात आली होती आणि आता हवामानाच्या परिस्थितीनुसार पुन्हा सुरु करुन या सभेत कर्नाटकच्या नवीन मुख्यमंत्र्यांना बोलावून त्यांचा सत्कार करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असेही तपासे म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांना लक्ष्य करण्यासाठी केंद्रीय एजन्सीचा वापर भाजप करत आहे. जयंत पाटील हे सचोटीचे आणि नैतिक चारित्र्याचे व्यक्ती आहेत हे महाराष्ट्राला ठाऊक आहे, त्यामुळे केंद्रीय एजन्सींद्वारे दबाव आणून त्यांच्यावर फारसा परिणाम होणार नाही भाजपचा हा डाव त्यांच्यावरच बूमरँग होईल, असेही महेश तपासे म्हणाले.


























































