“हे सरकार नाममात्र असून त्यांच्यात समन्वयाचा अभाव”, एकनाथ खडसेंची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
eknath-khadse

सरकार स्थापन होऊन सात महिने झाले. मात्र अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. राज्याचा कारभार 18 मंत्री पाहत आहेत. यामुळे योग्य निर्णय होऊ शकत नाहीत. सध्याचं सरकार अस्थिर असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर हे सरकार अवलंबून आहे. त्यामुळे हे सरकार केवळ नाममात्र असून त्यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी केली आहे.

लव जिहाद विरोधात राज्यात व देशात जन आक्रोश मोर्चा काढला जातो आहे. लव जिहादला विरोध हा समाजात असला पाहिजे परंतु काही विशिष्ट पक्ष किंवा गट निवडणूक जवळ आल्या की असं काहीतरी करतात, अशी टीका खडसे यांनी केली आहे. हिंदुत्ववादाच्या माध्यमातून मतदान होण्याच्या दृष्टीने हे प्रयत्न असू शकतात असे ते म्हणाले.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार उत्तम काम करत असताना केवळ सत्तेच्या लालसेसाठी पक्ष फोडण्याचा खटाटोप करण्यात आला. राज्यात सध्या बेरोजगारी, महागाई असून उद्योग राज्याबाहेर चालले आहेत. कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. राज्यावर 6 लाख 66 हजार कोटी रुपयांच कर्ज आहे.