शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणारा गजाआड, बिहारच्या पटण्यात पकडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱयाला गावदेवी पोलिसांनी बिहारच्या पाटण्यात जाऊन पकडले. नारायण सोनी (46) असे त्या धमकावणाऱयाचे नाव असल्याचे समजते. त्याला आज कोर्टात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

मुंबईतील ‘सिल्वर ओक’ या शरद पवार यांच्या निवासस्थानी निनावी कॉल करून आरोपीने शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी पवार यांच्या कार्यालयातील पोलिसांच्या फोन ऑपरेटरने तक्रार दिल्यानंतर गावदेवी पोलीस ठाण्यात धमकी देणाऱया व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी धमकावणाऱयाचा शोध घेतला असता तो  बिहारच्या पाटणा येथे राहत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार गावदेवी पोलिसांच्या एका पथकाने पाटणा गाठून सोनीला पकडून आणले. यापूर्वीदेखील अनेक वेळा सिल्वर ओकवर अशा प्रकारे कॉल केल्याचे त्याच्या चौकशीतून समोर आले. दरम्यान, दहा वर्षांपूर्वी तो पुण्यात राहायला होता.

त्या वेळी त्याची पत्नी दुसऱ्या व्यक्तीसोबत पळून गेली. ती सध्या पाटण्यातच राहत असून तिचा दुसरा पती राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. या प्रकरणात राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मध्यस्थी करण्यात आली नाही. शिवाय महाराष्ट्रात आल्यामुळे मी उद्ध्वस्त झालो. धंद्यातदेखील प्रचंड तोटा झाला असे सोनी बोलत असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून त्यातूनच त्याची मानसिक स्थिती कशी आहे ते समजू शकेल. त्यानंतरच तो असा  का बोलतोय ते स्पष्ट होईल, असेही सांगण्यात आले. गावदेवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.