
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत त्यांच्या राजकीय हालचालींवरून उठलेल्या अफवांमधील हवाच काढून घेतली. ‘कारण नसताना माझ्याबद्दल माझ्या सहकाऱ्यांबद्दल गैरसमज निर्माण करण्याचं काम जाणीवपूर्वक वेगवेगळ्या ठिकाणी होताना मी स्वत: बघतो आहे. मात्र अशा कोणत्याही बातम्यामध्ये तथ्य नाही. त्या जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत’, असं अजित पवार यांनी स्पष्ट सांगून चर्चांना पूर्णविराम दिला.
‘ज्याप्रकारच्या बातम्या तुम्ही सगळे दाखवत आहात त्याच्यात यत्किंचितही तथ्य नाही. चाळीस आमदारांच्या सह्या घेतल्या असं तुम्ही दाखवत आहात. तशा काही सह्या घेतलेल्या नाहीत. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाचेच आहोत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच राहणार आहोत, त्यामुळे या बातम्यांना कुठल्याही प्रकारचा आधार नाही’, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. वेगवेगळे आमदार आज माझ्या ऑफिसमध्ये आले होते त्याच्यातून वेगळा अर्थ काढू नका. तो आमच्या कामाचा भाग आहे. त्यांची वेगवेगळी कामं होती ती कामं घेऊन ते आले होते. त्यांची इतरही कामं होती त्याकरता मी फोन केला आणि मदत करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ते फक्त कामासाठी आले होते, असंही त्यांनी सांगितलं.
त्याचवेळी आमदारांबद्दल माध्यमांमधून दाखवण्यात येणाऱ्या बातम्यामुळे आमचे कार्यकर्ते देखील संभ्रमात येतात. त्या सगळ्यांना मला सांगायचं आहे की आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच, नेतृत्त्वाखालीच पक्षाची स्थापना झाली आहे आणि पक्षात चढउतार आले परंतु काही बातम्या जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत. महाराष्ट्रातील बेरोजगारीचे प्रश्न, अवकाळीच्या नुकसान भरपाईचे प्रश्न आहेत त्यावरून लक्षं हटवण्यासाठी जाणीवपूर्वक या बातम्या पसरवल्या जात आहेत, असं म्हणून त्यांनी सत्ताधारी मिंधे-फडवणवीस सरकारकडे रोख वळवला.
अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळत नाही, कांदा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही, असं म्हणत त्यांनी राज्य सरकारला लक्ष्य केलं. त्यासोबतच त्यांनी माध्यमांनाही सुनावलं. राज्यात एवढे गंभीर प्रश्न असताना माझ्या सरकारी बंगल्याच्या आजूबाजूला कॅमेरे लावण्यात आले आहेत, अरे काय चाललं आहे हे सगळं? मी बोलणार असेल तर मी बोलेन, पार्टी कार्यालयात बोलेन, विधीमंडळात परवानगी घेऊन बोलेन किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी कुठे गेलो तर तिथे पत्रकार मित्रांशी बोलेन, पण आपणही त्यात सभ्यता पाळली पाहिजे, अशी विनंती त्यांनी केली.
विनंती आहे की तुम्ही ज्या बातम्या चालवत आहात त्यात काही तथ्य नाही. आता तुम्ही जे अंदाज व्यक्त करत आहात त्यांना मी म्हणालो की आता काय अॅफिडेव्हिटवर लिहून देऊ की स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ अशा प्रकारची वेळ तुम्ही आणली आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया अजित पवार यांनी व्यक्त केली.
सर्वोच्च न्यायालयात जो निकाल लागेल तो लागेल. पण आम्ही महाविकास आघाडी म्हणून सभा घेत आहोत, त्या सुरूच राहणार आहेत. पण त्या सभांमध्येही अजित पवार का बोलले नाहीत हेच सतत दाखवतात. पण आमचं ठरलं आहे की प्रत्येक पक्षाचे दोन जण बोलणार. बाळासाहेब थोरातही बोलले नव्हते. तेव्हा काही नाही बातम्या दाखवल्या. मी बोललो नाही तर लगेच बातम्या दाखवल्या. आमची आता मुंबईत सभा होणार आहे. त्या सभेला जी नावं ठरतील तीच बोलतील. तिनही पक्षांनी हे ठरवलं आहे की दोन दोन जण बोलतील, सभा फार लांबायला नको असाही त्यामागे उद्देश असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं.
ध चा मा करू नका ना रे बाबांनो…
आमचं सरकार पडल्यानंतर मी उपमुख्यमंत्री असं अशी माहिती होती ती काढली, बाकी सगळं आहे तसंच आहे. मात्र त्याच्याही बातम्या केल्या जात आहेत. झेंडा काढला, अमकं काढलं… आता झेंडा काय तोंडावर लावून फिरू… ध चा मा करू नका. मला जे वाटेल ते मी सांगेन, कुण्या ज्योतिषाची गरज नाही, दुसरीकडून बातम्या घेण्याची गरज नाही. काही विघ्नसंतोषी लोक आमच्याबद्दलच्या बातम्या पेरण्याचं काम करत असतील, माझ्या पक्षातील लोक असं करत नाहीत, पण बाहेरच्या पक्षातील लोक असं करतात, असंही ते म्हणाले.
आमच्या सहनशीलतेचा अंत होऊन देऊ नका!
कोणत्याही 40, 50, 60 लाख अशा सह्या झालेल्या नाहीत. आम्ही परिवार आहोत, परिवार म्हणूनच काम करत राहणार आहोत. जी काही संभ्रमावस्था निर्माण करून गैरसमज पसरवण्याचं काम चालू आहे, पण आम्ही देखील हाडामासाचे आहोत. आमचीपण सहनशीलता संपते. आमच्या सहनशीलतेचा अंत होऊन देऊ नका, अशी विनंती असल्याचं अजित पवार म्हणाले.
उद्या जो काही निर्णय घेतला जाईल तो पक्ष म्हणून घेतला जाईल. आता पक्षाने निर्णय घेतला आहे महाविकास आघाडीसोबत जाण्याचा आणि सभाही ठरल्या आहेत. उलट सभेला परवानगी नाकारल्या जातात. प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार घटनेने दिला आहे. त्याचा आदर केला पाहिजे त्याला आपलं म्हणणं मांडण्याची जागा दिली पाहिजे. मात्र न्यायालयाने जर सांगितलं तर त्याचा आदर आपण केला पाहिजे, असंही ते म्हणाले.
जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही काम करत राहू
राष्ट्रवादी पक्षाची स्थापना स्वाभिमानातून झाली आहे, तेव्हापासून आम्ही काम करत आहोत, आजही काम करत आहोत. उद्याही काम करत राहणार. जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही काम करत राहू, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
























































