
>>भारत गोरेगावकर / प्रणय पाटील
राष्ट्रवादीच्या नव्या पक्षचिन्हाचे दणक्यात अनावरण संघर्षातून प्रेरणा देणारी तुतारी…यश मिळणारच
राज्याराज्यात भांडणे लावणारे केंद्रातील सरकार रयतेच्या कल्याणासाठी घालवावेच लागेल
हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या ‘तुतारी’ची ललकारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने घुमली. शरद पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी पक्षाच्या ‘तुतारी फुंकणारा माणूस’ या नव्या निशाणीचे प्रचंड उत्साहात आणि जल्लोषात अनावरण झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्रातून एकवटलेल्या कार्यकर्त्यांसमोर आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग शरद पवार यांनी फुंकले. संघर्षातून प्रेरणा देणारी ही तुतारी आहे… यश मिळणारच… असा दुर्दम्य विश्वास व्यक्त करताना राज्याराज्यात भांडणे लावणारे केंद्रातील सरकार रयतेच्या राज्यासाठी घालवावेच लागेल, असा नारा शरद पवार यांनी दिला तेव्हा ‘फुंका तुतारी… गाडा गद्दारी’ अशा घोषणांनी रायगड दणाणून गेला.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या पक्षाला नवे नाव व तुतारी फुंकणारा माणूस हे नवे चिन्ह दिले. आज या चिन्हाचा अनावरण सोहळा किल्ले रायगडावर मोठय़ा जल्लोषात पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पक्षाची निशाणी हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने आणि ढोलताशांचा गजरात, तुतारींच्या निनादात किल्ल्याच्या सदरेवरील सिंहासनाधिष्ठत शिवछत्रपतींना समर्पित करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, आमदार जितेंद्र आव्हाड, फौजिया खान यांचीही भाषणे झाली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री राजेश टोपे, पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल तटकरे, रायगड जिल्हाध्यक्ष सुरेश टोकरे, युवा नेते मेहबूब शेख, साधना घाणेकर यांच्यासह खासदार, आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
40 वर्षांनंतर शरद पवार रायगडावर
तब्बल 40 वर्षांनंतर शरद पवार आज रायगडावर आले. 84 वयोमान असलेल्या पवारांनी आधी रोप वेने गड गाठला आणि तेथून ते डोलीमधून राजसदरेवर आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. पवार यांनी छत्रपती शिवरायांच्या सिंहासनाधिष्ठत पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करून वंदन केले.
निवडणूक आयोगाने विजयाचे रणशिंग फुंकायलाच ‘तुतारी’ दिलीय
नव्या पक्षचिन्हाचे अनावरण केल्यानंतर शरद पवार यांनी किल्ले रायगडावरूनच देशात आणि राज्यात सत्तापरिवर्तन करायलाच हवे, अशी हाक दिली. आपल्या छोटेखानी भाषणात शरद पवार म्हणाले, सध्याचा संघर्ष हा वैचारिक संघर्ष आहे. राज्यात अडचणी वाढतील अशी स्थिती आहे. शिवछत्रपतींचे राज्य हे सामान्यांची सेवा करणारे राज्य होते. तेव्हा देशात अनेक राजे होऊन गेले, पण छत्रपतींनी निर्माण केलेला आदर्श आजही प्रेरणा देणार आहे. त्यामुळे सध्याची महाराष्ट्राची ही स्थिती बदलायची असेल तर त्यासाठी पुन्हा एकदा जनतेचे राज्य येईल यासाठी प्रयत्न करावे लागतील. स्वाभिमानी महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी ‘तुतारी’ ही प्रेरणा देणारी शक्ती ठरेल. निवडणूक आयोगाने या विजयाचे रणशिंग फुंकायलाच आपल्याला ‘तुतारी’ दिली आहे. संघर्षातून प्रेरणा देणारी ही तुतारी आहे. तुमच्या संघर्षातून, त्यागातून यश मिळेलच. त्यासाठी एकजुटीने कामाला लागा. या यशाची आणि विजयाची प्रेरणा या ऐतिहासिक भूमीतून घेऊन जनतेत जाऊया आणि जनताजनार्दनाची सेवा करूया, असे आवाहन पवार यांनी केले.




























































