आणि बद्रीनारायण येऊन दर्शन देती वासुदेव स्वामींना…

>> निळकंठ कुलकर्णी ([email protected])

।। श्री गुरुदेव दत्त ।।

“श्री वासुदेव स्वामी जाती बद्रीनाथासी,
दर्शन घेतल्याविना मागे फिरणार नाही असे स्वामी म्हणती ,
श्रम लागले तरी किंवा देहपात झाला त्याची पर्वा नाही मज ,
तये वेळी बद्रीनारायण येऊन दर्शन देती स्वामींना”

।। श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज ।।

बद्रीनारायणाची यात्रा सुरू असताना श्री स्वामी महाराजांचे चौथे आणि पाचवे चातुर्मास कोठे झाले, याबद्दलची निश्चित माहिती अशी उपलब्ध झाली नाही. तरी सुद्धा या काळात हिमालयामध्येच त्यांचा संचार सुरू होता निश्चित! आता हिमालयातील आणखी काही भाग पाहावा अशी तीव्र श्री स्वामी महाराजांची इच्छा झाली. त्याप्रमाणे ऋषिकेश, देवप्रयाग, रुद्रप्रयाग, गुप्तकाशी इत्यादी ठिकाणी दोन तीन दिवस राहत प्रवास सुरु केला. दक्षिणी ब्राह्मण बरोबर होते, त्यामुळे भिक्षेचा प्रश्न नव्हता. त्यांना ओढ होती ती बद्रीनारायणाचे दर्शन घेण्याची! हे ठिकाण अत्यंत दुर्गम आहे. वाटेत त्यांनी जोशी मठाला भेट दिली. भगवत्पूज्यपाद श्रीमद आद्य शंकराचार्य स्वामी महाराजांच्या वास्तव्याने पुनीत झालेले हे स्थान हिंदू धर्माच्या चार पीठांपैकी उत्तरेचे हे पीठ ज्योतिर्मठ या नावाने प्रसिद्ध आहे. त्याचाच अपभ्रंश जोशी मठ आहे हे ठिकाण बद्रीनाथाच्या मंदिरापासून दूर आहे.

बदरी म्हणजे बोरीचे झाड. हे स्थान बद्रीकाश्रमाच्या परिसरात होते, पण आता तेथे एकही बोरीचे झाड दिसत नाही. राजा विशाल याने तेथेच तपश्चर्या करून नारायणांना प्रसन्न करून घेतले म्हणून बद्री विशाल असेही याचे नाव आहे. भगवान श्री विष्णूंनी या भूमीत तपश्चर्या केली होती. म्हणून येथे काळ्या शाळीग्राम – पाषाणातील भगवान श्री विष्णूची पद्मासनास्थितीत चतुर्भज मूर्ती आहे. परंतु मूर्तीचा मुखवटा व वरच्या दोन भुजा आज अस्तित्वात नाहीत. त्या ठिकाणी चंदनाचा मुखवटा बसविलेला आहे. बद्रीनारायणाच्या दर्शनाला जात असता वाटेत एके ठिकाणी मोठा कडा तुटून पडला होता. पुढे जाण्यास मार्ग नव्हता. त्यांच्या बरोबरचे इतर लोक मागे फिरले. श्री स्वामी महाराज मात्र तेथेच थांबले व पुढे कसे जावे याचा विचार करीत होते. इतक्यात त्यांना कड्यावरून दोन तेजस्वी पुरुष येताना दिसले. ते जवळ येऊन म्हणाले स्वामी! पुढे कडा तुटलेला आहे. जाण्यास मार्ग नाही. मार्गावर बर्फाचा थर आहे. चुकून जरी पाय घसरला तरी काही धडगत नाही. तेव्हा आपण परत जावे!

श्री स्वामी महाराज खणखणीत आवाजात त्यांना म्हणाले, आम्ही नारायणाचे दर्शन घेण्यासाठी आलो आहोत. ते घेतल्याशिवाय मागे फिरणार नाही. त्यासाठी कितीही त्रास पडला किंवा देहापात झाला तरी त्याची पर्वा नाही. पुढे जायला वाट नाही म्हणता मग आपण तिकडून कसे आलात? हे निर्धाराचे भाषण ऐकून ते दोघे तेजस्वी पुरुष नर नारायण मुनी स्वरूपात दिसू लागले. श्री स्वामी महाराजांना दर्शन देऊन ते अदृश्य झाले. अशा तऱ्हेने नर नारायणाचे दर्शन झाल्याने श्री स्वामी महाराजांना अतिशय आनंद झाला.

श्री स्वामी महाराज मग पुढील प्रवासाला निघाले. वाटेत त्यांना एक सरोवर लागले. जबरदस्त थंडी असूनही त्या सरोवरातील पाणी गोठलेले नव्हते. त्यांनी पाण्याला स्पर्श करून पाहिला. तो उबदार स्पर्श जाणवताच क्षण भर स्वच्छ होऊन श्री स्वामी महाराज त्या शांत सरोवराकडे बघत राहिले. इतक्यात एकाएकी त्या सरोवराच्या मध्यभागी पृष्ठभागावर खळबळ निर्माण झाली. त्या उसळलेल्या पाण्यातून सरोवरात तपश्चर्या करणारे सिद्धासन घातलेले एक योगीराज वर आले. त्यांनी श्रीस्वामी महाराजांकडे पाहून स्मितहास्य केले. श्री स्वामी महाराजांनीही नारायण असे म्हणून हात वर केला. त्यांना आशीर्वाद दिला ते योगी पुन्हा पाण्याखाली गेले.

आपली प्रतिक्रिया द्या